महापालिका शिक्षण मंडळावर वारंवार तोंडसुख घेणारे नगरसेवक शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकाबाबत किती उदासीन आहेत, याचे दर्शन गुरुवारी खास सभेत घडले. तब्बल ३०० कोटींच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी बोलावण्यात आलेल्या खास सभेत १५७ नगरसेवकांपैकी सुरुवातीला १२ आणि अखेरीस अवघे १६ नगरसेवक उपस्थित होते. नगरसेवक न आल्यामुळे ही सभा दहाच मिनिटात तहकूब करण्यात आली.
महापालिकेची खास सभा सकाळी अकरा वाजता सुरू होताना सभागृहात तीन-चार नगरसेवक होते. त्यानंतर तीन-चार जण सभागृहात आले. प्रारंभी महापालिकेची दिनदर्शिका प्रकाशित करण्याचा कार्यक्रम सभेत झाला. आणखी वाट पाहूनही नगरसेवकांची संख्या दहा-बारापेक्षा काही वाढली नाही. अखेर शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्याचा विषय तहकूब करून ३० डिसेंबर रोजी सभा घ्यावी, असा निर्णय सभेत एकमताने घेण्यात आला. शिक्षण मंडळाचा विषय निघाला की, सर्वपक्षीय नगरसेवक मंडळाच्या कारभारावर टीकेची झोड उठवतात. त्यामुळे मंडळाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यासाठीच्या सभेत उपस्थित राहून नगरसेवक चर्चेत भाग घेतील, सूचना करतील अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात तब्बल १४१ जणांनी या सभेकडेच पाठ फिरवली.

दोनशे जणांचे जेवण सांगितले होते..
शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकावर सकाळी अकरापासून पुढे दिवसभर चर्चा होईल अशी अपेक्षा होती. त्यामुळे नगरसेवकांसाठी मध्यंतरात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भोजनाचीही व्यवस्था केली होती. संबंधितांना दोनशे जणांची ऑर्डर देण्यात आली होती. मात्र, दहा मिनिटात सभा संपल्यामुळे ही व्यवस्था रद्द करावी लागली.