पुणे : परदेशातील उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी खुल्या गटासाठी एकूण ४० जागा असताना केवळ २६ विद्यार्थ्यांचीच निवड करण्यात आली आहे. त्यातही पीएच.डी.साठी केवळ एकाच विद्यार्थ्याचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजना २०१८-१९मध्ये सुरू करण्यात आली. सुरुवातीला या योजनेत पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी दहा, पीएच.डी.साठी दहा अशा एकूण वीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात येत होती. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची संख्या १० वरून ३० करण्यात आली. त्यामुळे एकूण विद्यार्थिसंख्या ४० करण्यात आली. या शिष्यवृत्ती योजनेत शैक्षणिक वर्ष २०२४-२५साठी निवड प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.
हे ही वाचा…पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाळगणारा चिंचवडमधील तरुण गजाआड, आरोपीकडून २५० बनावट नोटा जप्त
पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या दहा जागांसाठी तीनच अर्ज दाखल झाले होते. मात्र, दोन उमेदवारांचे अर्ज छाननी समितीने अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे गुणवत्तेनुसार एकाच उमेदवाराची निवड करण्यात आली. तर पदव्युत्तर पदवी, पदविका अभ्यासक्रमाच्या एकूण ३० जागांसाठी २५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. निवड झालेले विद्यार्थी ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम, नेदरलँड, आयर्लंड या देशातील विद्यापीठांतील अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार आहेत.
हे ही वाचा…‘पीएमआरडीए’च्या १३३७ सदनिकांसाठी लाॅटरी, आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू
संबंधित विद्यार्थ्यांना गृह विभागाच्या चौकशीच्या अधीन राहून मंजूर करण्यात आली आहे. चौकशीमध्ये शिष्यवृत्तीचा अर्ज दाखल करताना चुकीची माहिती दिल्याचे निदर्शनास आल्यास शिष्यवृत्ती रद्द करण्यात येईल. तसेच खोटी माहिती, खोटी कागदपत्रे सादर केल्यास पुढील शिक्षणासाठी अटकाव करून त्याच्याकडून झालेल्या खर्चाची १५ टक्के चक्रवाढ व्याजदराने वसुलीसह कारवाई करण्यात येईल. शिष्यवृत्ती मंजूर केलेल्या विद्यार्थ्याने त्याच्या शिक्षणाचा राज्याला लाभ करून देण्यासाठी राज्यात परत येऊन राज्य शासनाला सेवा देणे अपेक्षित आहे. त्याबाबतचे बंधपत्र देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.