संजय जाधव

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून राज्यभरात जाणाऱ्या निम्म्या एसटी गाड्या बुधवारी रद्द करण्यात आल्या. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशात जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. गाड्या रद्द करण्यात आल्यामुळे एसटीला बुधवारी ३३ लाख २७ हजार रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.

पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर (वाकडेवाडी), पुणे स्टेशन आणि पिंपरी-चिंचवडमधील वल्लभनगर आगारातून राज्यभरात एसटी गाड्या सोडण्यात येतात. एसटीच्या पुणे विभागाकडून दररोज एक हजार २२९ गाड्या सोडल्या जातात. मराठा आरक्षण आंदोलन तीव्र झाल्यामुळे एसटीच्या अनेक गाड्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला. एसटीच्या बुधवारी एकूण ६१४ गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे ८४ हजार ९४१ किलोमीटरच्या फेऱ्या झाल्या नाहीत. त्यातून एसटीचे ३३ लाख २७ हजार रुपयांचे नुकसान झाले.

आणखी वाचा-अभाविप आणि एसएफआयमध्ये मारामारी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील घटना

स्वारगेट आगारातून प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गाड्या सोडल्या जातात. शिवाजीनगर (वाकडेवाडी) आगारातून मराठवाड्यात गाड्या सोडल्या जातात. मराठा आरक्षण आंदोलनामुळे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, जालना, लातूर, नागपूर, अमरावती, अकोला आणि जळगाव यासह इतर ठिकाणी जाणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

मराठा आरक्षण आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी तेथील स्थानिक पोलिसांच्या सूचनेनुसार एसटी गाड्या पाठविल्या जात नाहीत. पुणे विभागात राज्यभरात जाणाऱ्या निम्म्या गाड्या बुधवारी रद्द करण्यात आल्या. -कैलास पाटील, विभाग नियंत्रक

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Outcome of maratha reservation movement half of st bus cancelled pune print news stj 05 mrj
Show comments