पुण्यात शिकणाऱ्या बाहेरगावच्या आणि परराज्यातील लाखो विद्यार्थी मतदारांना मतदानाला मुकावे लागण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या परीक्षांमुळे या विद्यार्थ्यांना आपल्या गावी जाऊन मतदान करणे शक्य नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.
पुण्यात बाहेरगावाहून आणि परराज्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात शिक्षणासाठी परराज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही पुण्यात सर्वाधिक आहे. मतदार यादीमध्ये अधिकाधिक नावनोंदणी व्हावी, तरूणांना या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेता यावे, यासाठी विद्यापीठ, महाविद्यालये सर्वच स्तरातून मोहिमा राबवण्यात आल्या. विद्यार्थ्यांची नावनोंदणीही करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात शिक्षणासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांना येत्या निवडणुकीमध्ये मतदानाला मुकावे लागणार आहे. बहुतेक विद्यार्थ्यांचे त्यांच्या मूळ गावी मतदार यादीत नाव आहे. हे विद्यार्थी पुण्यात वसतिगृहांमध्ये किंवा पेईंग गेस्ट म्हणून राहतात. त्यामुळे पुण्यात या विद्यार्थ्यांचा रहिवासी पुरावा किंवा कायमस्वरूपी पत्ता नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांची नोंद पुण्यातील मतदार यादीमध्ये नाही.
पुणे विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठाच्या या सत्राच्या परीक्षा सर्वसाधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये सुरू होत असून मे अखेरीस संपत आहेत. राज्यात तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. १० एप्रिलला प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्य़ांमध्ये, १७ एप्रिलला पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हे आणि २४ एप्रिलला मुंबई, कोकण आणि नाशिक या भागांमध्ये मतदान होणार आहे. पुण्यामध्ये १७ एप्रिलला मतदान असल्यामुळे त्या दिवशीचे परीक्षांचे वेळापत्रक पुणे विद्यापीठाकडून बदलले जाण्याची शक्यता आहे. मात्र, विदर्भ, नाशिक, मुंबई येथील विद्यार्थ्यांना मात्र मतदानासाठी आपल्या गावी जाण्याची संधी मिळणे परीक्षांमुळे शक्य नाही. विद्यापीठाने १० आणि २४ तारखेच्या परीक्षेचे वेळापत्रक बदलले, तरीही आदल्या आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्यामुळे काही तासांचा प्रवास करून गावी जाऊन मतदान करणे शक्य नसल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.
परराज्यातून आलेल्या विद्यार्थ्यांनाही आपल्या राज्यात ज्या दिवशी मतदान असेल, त्या दिवशी हजर राहणे शक्य होणार नाही. विद्यापीठात देशातील अनेक राज्यांमधील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रत्येक राज्यातील मतदानाच्या तारखांचा विचार करून विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे वेळापत्रक ठरवणे व्यावहारिकदृष्टय़ा शक्य नसल्याचे विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘‘मी या वेळी पहिल्यांदाच मतदान करणार होते. मात्र, परीक्षा, प्रॅक्टिकल्स यांमुळे मतदानाच्या दिवशी गावी जाऊ शकणार नाही. गावी जाऊन परत येण्यामध्ये खूप वेळ जाणार आहे आणि परीक्षांमुळे ते जमणार नाही.’’
– कल्पना खेंगे, बीड

‘‘माझ्या गावी जायलाच मला दोन दिवस लागतात. माझ्या राज्यातील मतदानाची तारीखही वेगळी आहे. त्या वेळी फक्त मतदानासाठी घरी जाणे जमेल असे वाटत नाही. कारण त्या वेळी परीक्षा सुरू होत आहेत.’’
– देबश्री दत्ता, पश्चिम बंगाल