पिंपरी : आर्थिक वर्ष संपण्यास अवघे सहा दिवस शिल्लक असतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील एक लाख ४८ हजार २०३ निवासी मालमत्ताधारकांकडे ३५४ कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले. थकबाकीदारांनी कर भरण्याचे आवाहन महापालिकेने केले. तसेच देयकामधील कचरा सेवाशुल्क वगळून कर भरता येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>> मावळ लोकसभा मतदारसंघात नाकाबंदी दरम्यान सापडले ५० लाख; रक्कम आणि गाडी पोलिसांनी घेतली ताब्यात
पिंपरी-चिंचवड शहरात सहा लाख २५ हजार मालमत्ता आहेत. यापैकी चार लाख ३३ हजार ७५९ मालमत्ताधारकांनी पूर्ण कराचा भरणा केला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत महापालिकेच्या तिजोरीत ८८६ कोटींचा महसूल जमा झाला आहे. चालू आर्थिक वर्षात कर संकलन विभागाला एक हजार कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सहा दिवसांत ११४ कोटींची वसुली करण्याचे आव्हान कर संकलन विभागासमोर असणार आहे. विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, लाखबंद (सील), वर्तमानपत्रात नावे प्रसिद्ध करणे, नळजोड खंडित करणे, जनजागृती करण्यासह विविध मोहिमा हाती घेतल्या आहेत. कर संकलन विभागाचे कर्मचारी मालमत्ताधारकांकडे कर वसुलीसाठी जातात, तेव्हा कचरा सेवाशुल्क रद्द झाला असताना त्या रक्कमेचा देयकात समावेश झाल्याने कर भरला नसल्याचे मालत्ताधारकांनी सांगितले. मात्र, ऑनलाइन देयकात कचरा सेवाशुल्काची रक्कम दिसत असली, तरी शासन आदेशानुसार शुल्क वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. देयकामध्ये एकूण भरायची जी रक्कम आहे, ती कचरा सेवाशुल्क वजा करून दर्शविण्यात आली आहे. मालमत्ताधारकांना कचरा सेवाशुल्क भरण्याची आवश्यकता नाही. तसेच अंतिम रक्कम जी देयकामध्ये दर्शविण्यात आली आहे. त्यामध्ये कचरा सेवाशुल्काचा समावेश नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांनी थकीत कर त्वरित भरावा, असे आवाहन सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी केले.