पुणे : महापालिकेतील माजी नेत्याच्या भागातील कामे करण्यासठी महापालिकेत प्रशासकराज असतानाही २ कोटी ४४ लाख ४६ हजार रुपयांचा निधी स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १६ साठी पाच निविदा मंजूर करून, हा निधी दिला जाणार आहे. या पाच निविदांसाठी विशेष म्हणजे एकच ठेकेदार पात्र ठरला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील असलेल्या भाजपच्या माजी पदाधिकाऱ्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा महापालिकेत रंगत आहे. माजी नगरसेवकांनी प्रभागातील कामांसाठी निधी मागितला, तर निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जाते. मग गेल्या सत्रामध्ये नगरसेवक नसतानाही या पदाधिकाऱ्याच्या भागासाठी निधीची खैरात का, असा प्रश्न भाजपच्याच काही माजी नगरसेवकांकडून विचारला जात आहे.
राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीच्या काही माजी नगरसेवकांच्या प्रभागात कोट्यवधी रुपयांचा निधी महापालिका प्रशासनाने वळविला आहे. गेल्या महिन्यातच राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या माजी नगरसेवकासाठी बाणेर, बालेवाडी, सूस या भागात ३८ कोटी ५० लाख रुपयांचा निधी प्रशासनाने वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून दिला आहे. महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासासाठी ठेवण्यात आलेल्या निधीचे वर्गीकरण करून हा निधी देण्यात आला होता.
शहरातील अनेक प्रभागांमध्ये रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सांडपाणी वाहिनी, पाणी पुरवठा, तसेच आरोग्य विषयक सेवा आणि अन्य कामांसाठी महापालिकेने प्रभागासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी अनेक माजी नगरसेवक अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करत आहेत. भाजपच्या अनेक माजी नगरसेवकांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, काही खास मर्जीतील नेत्यांसाठी प्रशासन कोट्यवधींच्या निधीची खैरात करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये पाच कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये केवळ दोन ठेकेदार पात्र ठरले. त्यातील पाचही ठिकाणी मे. ख्वाजा गरीब नवाझ एंटरप्रायजेसने पूर्वगणनपत्रकाच्या २.२५ टक्के कमी दराने निविदा भरली आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या श्री भवानी कन्स्ट्रक्शनने तीन निविदांसाठी ० टक्के, तर दोन निविदांसाठी १ टक्के कमी दराने निविदा भरली आहे. त्यामुळे या सर्व निविदा ख्वाजा गरीब नवाझ एंटरप्राजेसला मिळाल्या आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेंद्र भोसले यांनी याला मंजुरी दिली आहे.
ही कामे होणार प्रभाग क्रमांक १६ मधील रास्ता पेठेत विविध ठिकाणी मलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी ४८ लाख ८९ हजार ३८८ रुपयांची निविदा, रियाझ हाइट्स ते आंबेडकर भवन येथे ६०० मिमि व्यासाची मलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी ४८ लाख ८९ हजार ५०३ रुपये, काळा वाडा खड्डा गॅरेज येथे ६०० मिमी व्यासाची मलवाहिनी टाकण्यासाठी ४८ लाख ८८ हजार ५४० रुपये, सोमवार पेठेतील मुख्य मलवाहिनी बदलणे व दुरुस्त करणे या कामासाठी ४८ लाख ८९ हजार ३८८ रुपये आणि मंगळवार पेठेतील मुख्य मलवाहिनी बदलण्यासाठी ४८ लाख ८५ हजार ५४० रुपयांच्या खर्चाची निविदा स्थायी समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आल्या आहेत.