पुणे : सराफ बाजारातील एका पेढीतून चोरट्यांनी पाच किलो सोने, तसेच दहा लाख ९३ हजारांची रोकड असा तीन कोटी ३२ लाख नऊ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. आमदार रवींद्र धंगेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ ही घटना घडल्याने सराफ बाजारात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा >>> पुण्यामधील समाविष्ट गावांतील नागरिकांसाठी खुशखबर : आता महापालिकेतून मिळणार सुविधा
याबाबत दीपक माने (वय ३९, रा. साई काॅर्नर, रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सराफ पेढीतील कारागिरांनी दागिने आणि रोकड चोरल्याचा संशय माने यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रविवार पेठेत माने यांची राज कास्टिंग पेढी आहे. या पेढीत दागिने घडवून त्याची विक्री सराफ बाजारातील पेढींना केली जाते. राज कास्टिंगजवळ कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे कार्यालय आहे. नववर्षाच्या गडबडीत माने होते. त्यांनी पेढीत पाच किलो सोने, तसेच दहा लाख ९३ हजारांची राेकड ठेवली होती. रविवारी (३१ डिसेंबर) मध्यरात्री पेढीतील कारागिरांनी साेने, तसेच राेकड असा तीन कोटी ३२ लाख नऊ हजार २२८ रुपयांचा ऐवज चोरुन नेला, असे माने यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पेढीतून सोने आणि रोकड सोमवारी (१ जानेवारी) उघडकीस आला. त्यानंतर माने यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा, सहायक निरीक्षक वैभव गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पेढीतील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सहायक निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहे.