भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरातील नागरिकांची पिंपरीतील महामानवाच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी दिवसभर गर्दी उसळली होती. सायंकाळी मिरवणुकांमुळे गर्दीचा महापूर उसळल्याचे चित्र दिसून आले.
डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात विविध संस्था, संघटनांच्या वतीने अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरीत बाबासाहेबांच्या पुतळ्यास मानवंदना करण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांचा ओघ सुरू झाला होता. शहराच्या वतीने महापौर मोहिनी लांडे यांनी मानवंदना दिली. मंडळे मिरवणुकीने या ठिकाणी येताना दिसत होती. राजकीय तसेच सामाजिक संस्थांनी लावलेल्या स्वागत फलकांमुळे पिंपरी चौक गजबजून गेला होता. आगामी निवडणुकांमधील संभाव्य उमेदवारांचे फलक अधिक ठळकपणे दिसून येत होते. पिंपरी महापालिकेच्या वतीने जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप करण्यात आला. शनिवारी रात्री आतषबाजी करण्यात आली.