पुणे : शहरात वाहनचालकांचा अतिवेग पादचाऱ्यांचा जिवावर बेतण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. आठवडाभरात शहराच्या वेगवेगळ्या भागांत झालेल्या ‘हिट अँड रन’ घटनांत तीन पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला. त्यामध्ये दोन ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यातच काही भागांत ‘सीसीटीव्ही’ नसल्याने पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यास अडचणी येत आहेत.
कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावरील उंड्री परिसरात सकाळी फिरायला निघालेले सुजितकुमार सिंह (वय ४९, रा. उंड्री) यांचा मंगळवारी सकाळी भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. डेक्कन जिमखाना भागातील बीएमसीसी रस्त्यावर भरधाव वाहनाच्या धडकेत अरुण जोशी (वय ६०, रा. विवेकश्री बिल्डिंग, राजेंद्रनगर) यांचा मृत्यू झाल्याची घटनाही नुकतीच घडली. नगर रस्त्यावरील येरवडा परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या अमिना करीम मेघानी (वय ६०, रा. विलमिन सोसायटी, आगाखान पॅलेससमोर, शास्त्रीनगर, येरवडा) यांचाही भरधाव वाहनाच्या धडकेतच मृत्यू झाल्याची घटना घडली.
पादचाऱ्यांना किंवा दुचाकीस्वारांना धडक देऊन वाहनचालक पसार होण्याच्या घटना शहरांत वाढल्या आहेत. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हेही दाखल होतात. त्यानुसार, ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण तपासून पसार झालेल्या वाहनचालकाचा माग काढण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही भागांत सीसीटीव्हीच नसल्याने ‘हिट अँड रन’ प्रकरणांतील अनेक वाहनचालकांचा शोध घेण्यास अडचणी येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शहरात २४ अपघातप्रवण ठिकाणे
‘शहरातील ज्या भागांत सातत्याने अपघात घडतात, अशी २४ अपघातप्रवण ठिकाणे (ब्लॅक स्पाॅट) पोलिसांनी निश्चित केली आहेत. या भागातील अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दीर्घकालीन कृती आरखडा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार या भागातील अपघात रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत,’ असे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितले.
नगर रस्त्यावर ‘पादचारी सिग्नल’च्या वेळेत वाढ
नगर रस्ता, सोलापूर रस्त्यावर वाहतूकविषयक सुधारणा केल्यानंतर या भागातील वाहतुकीचा वेग वाढला आहे. नगर रस्ता रुंद आहे. या भागातून जाणाऱ्या पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी वाहतूक पोलिसांनी पादचारी सिग्नलची वेळ वाढविली आहे. पादचारी सिग्नलसाठी पूर्वी २० सेकंद वेळ होती. पोलिसांनी ती वाढवून ३० सेकंद केली आहे, असे अमोल झेंडे यांनी सांगितले.
शहरातील प्राणांतिक अपघात
अपघात – मृत्यू
५९ – ६२
(आकडेवारी जानेवारी-फेब्रुवारी २०२५ ची)
गेल्या वर्षात ३४५ जणांचा अपघाती मृत्यू
गेल्या वर्षी पुणे शहर परिसरात ३३४ प्राणांतिक अपघात घडले. या अपघातांत ३४५ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये दुचाकीस्वारांची संख्या जास्त आहे, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
पादचाऱ्यांना धडक देऊन पसार होण्याच्या घटना सकाळी किंवा रात्री उशिरा घडतात. बहुतांश अपघातांना अतिवेग कारणीभूत आहे. रस्ता मोकळा दिसल्यानंतर वाहनचालक वेगाने वाहन चालवितात. काही अपघातांत पादचाऱ्याचीही चूक असते. मात्र, बहुतांश वेळा वाहनचालकाचीच चूक असते.
अमोल झेंडे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा