केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पाच्या दिवशीचं लांबलचक भाषण ऐकून मीच थकलो असा टोला माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी लगावला आहे. पुण्यातल्या एका कार्यक्रमात त्यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात त्यांनी मोदी सरकारवर आणि १ फेब्रुवारीला सादर झालेल्या अर्थसंकल्पावर टीकास्त्र सोडलं. मंदीमुळे करवसुलीमध्ये मोठी घट झाली आहे. मात्र मोदी सरकार लपवाछपवी करत आहे असाही आरोप पी चिदंबरम यांनी केला. बाजारात सध्या सगळीकडे मंदीचं वातावरण आहे. कपड्यांचे सेल लागूनही खरेदी होत नाही. कारण ग्राहकांची क्रयशक्ती घटली आहे. मोदी सरकार आपल्या चुकाच मान्य करायला तयार नाही. त्यामुळेच अर्थव्यवस्था ढासळली आहे. महागाई गगनाला भिडली आहे. कृषी उत्पादन घटलं त्यामुळे सगळ्याच क्षेत्रात निगेटीव्ह ग्रोथ आहे. अशात अर्थव्यवस्था कशी सुधारणार ? असाही प्रश्न पी चिदंबरम यांनी उपस्थित केला. गेल्या वर्षीच्या बजेटची अंमलबजावणी तुम्ही व्यवस्थित करु शकत नसाल तर जनतेचा सरकारवर विश्वास कसा राहिल? अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अनेक उत्तरं आहेत. सरळ गरीबांच्या हातात पैसा ठेवल्यास त्यांची क्रयशक्ती वाढेल. उद्योजकांचा कॉर्पोरेट टॅक्स कमी करुन देशाचा काय फायदा झाला? या प्रश्नाचं उत्तर मोदी सरकारने द्यायला हवं असंही पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. हे सरकार सूट बूट वाल्यांचं सरकार आहे. त्यामुळे गरीबांच्या गरजा काय असतात हेच या सरकारला कळत नाही. मोदी सरकारला जीडीपीचंही काही कळत नाही. केंद्र सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे. देशाची आर्थिक स्थिती हाताबाहेर गेली आहे. CAA वरुन देशभरात आंदोलनं होत आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्यातही सरकार अपयशी ठरलं आहे. तसंच नरेंद्र मोदी हे इतिहासाचे संदर्भ न घेता बोलत असतात. त्यांनी एकदा आपला इतिहास नीट वाचावा आणि मग बोलावं असाही टोमणा चिदंबरम यांनी लगावला.