जन्मशताब्दीनिमित्त पुलं प्रेमींना खास अक्षरभेट..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘पुणेकर स्वत:ला शहाणे समजतात, असा पुण्याबाहेरच्या लोकांचा फार मोठा गैरसमज आहे. त्यांना पुण्याच्या स्वभावाची किल्लीच सापडली नाही. कुठलाही पुणेकर स्वत:ला शहाणा समजत नाही. इतरांना फक्त कमी शहाणा समजतो ; आपापसांतही!’’, ‘‘मुंबई महाराष्ट्रात येण्यापूर्वी ‘ती कुणाची?’ याच्यावर रण माजले होते. ती आता महाराष्ट्राची हे ठरले. आज तशी ती कुणाचीच नाही आणि जो येईल त्याची झाली आहे. माणूस कुठूनही येतो तो आपला मुंबईत रिचतो,’’ असे खास ‘पुलंशैली’तील आनंदाची दरवळ करणारे उत्तमोत्तम लेख, पुलंची महत्त्वाची भाषणे, दुर्मीळ छायाचित्रे‘लोकसत्ता’तर्फे  ‘अप्रकाशित पु. ल.’ या विशेषांकातून वाचकांपुढे येणार आहेत.

पुलं आणि सुनीताबाईंच्या पश्चात पुलंचे अप्रकाशित साहित्य त्यांचे मानसपुत्र डॉ. दिनेश आणि त्यांच्या पत्नी ज्योती यांनी तितक्याच प्रेमाने जपले. त्या दोघांनीही आजवर अप्रकाशित असलेले हे साहित्य खास ‘लोकसत्ता’साठी उपलब्ध करून दिले, म्हणून ते आता पुलंच्या जन्मशताब्दी वर्षांत प्रकाशात येत आहे. त्यामुळे हे साहित्य आणि पर्यायाने हा अंक म्हणजे पुलं प्रेमींसाठी पर्वणीच ठरणारा आहे. लेखक, कलाकार याच्यापलीकडे एक माणूस म्हणून पुलंचे भवतालाविषयी असलेले चिंतन, इतर मान्यवरांचा पुलंशी असलेला स्नेह, त्यांना पुलं कसे दिसले,  हे या अंकातून प्रथमच वाचकांपुढे येत आहे. खास पुलं शैलीचा आनंद, पुलंच्या बहुरंगी, बहुढंगी पण निर्विष आणि निरागस व्यक्तिमत्त्वाचे दर्शन या अंकातून पुलं प्रेमींना अनुभवता येईल.

पुलंना पाठवलेल्या पत्रात ग. दि. माडगूळकर म्हणतात,‘‘तुमच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या पुस्तकास अकादमीचें पारितोषिक मिळाल्याची वार्ता आतांच वाचली. तुमच्याविषयीं मी काय लिहूं? एकापाठोपाठ एक प्राप्त होणारे हे सन्मान केवळ दैवानें मिळताहेत असें नाहीं. तुमची तपश्चर्या या सन्मानांच्या रूपांनी फलद्रूप होत आहे. अंत:करणाचा आनंद कुठल्या शब्दांनी व्यक्त करूं? आपल्या काफिल्यांतील एक जहाज पैलतीराला लागलें. आतां समुद्र कितीही मानला तरी उरलेल्या नौकांना भय नाहीं. आमची दिशा बरोबर आहे याविषयीं आम्ही नि:शंक झालों. पाल्र्याचें नांव आतां पुरुषोत्तमनगर ठेवले पाहिजे. साहित्य, संगीत, अभिनय या तिन्ही कलांत तुम्ही असामान्य म्हणावें असे यश संपादन केलेत.’’

त्याशिवाय विनोदवीर चार्ली चॅप्लिन, साने गुरुजी, टाटा यांच्यावरील लेख, संगीतकार श्रीनिवास खळे, उंबरठा चित्रपट, बालगंधर्व रंगमंदिर वर्धापन दिनानिमित्त केलेली भाषणे, गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यासोबतचा पत्रव्यवहार, साक्षेपी समीक्षक-लेखक नरहर कुरुंदकर यांनी पुलंना लिहिलेले पत्र, विंदा करंदीकर, कुसुमाग्रज, विश्राम बेडेकर, श्री. ना. पेंडसे यांच्यासह झालेला पत्रव्यवहार, पुणे-मुंबईवरील लेख असे कधीही वाचकांपुढे न आलेले साहित्य या विशेषांकात आहे. तसेच काही खास छायाचित्रांचाही अंकात समावेश आहे. म्हणूनच प्रत्येक पुलं प्रेमीला, नव्या पिढीलाही आवडेल आणि आवर्जून संग्रही ठेवावासा वाटेल असाच हा अंक आहे.

स्वरनजर

गुलाबाच्या फुलाला वास का येतो? नाही सांगता येत. तो घेता येतो फक्त आपल्याला! त्या चालीचा सुगंध जर असा घेणारा मनुष्य असेल तर तो हे फालतू प्रश्न विचारणार नाही. खळ्यांना ती तशी दिसली. आपल्याकडे जुन्या काळी मंत्र ज्यांना सापडत ते ऋषी काय म्हणत माहिती आहे का? ‘मला मंत्र दिसला.’ म्हणून त्यांना द्रष्टा म्हणतात ना! पाहणारा. त्यांनी काय पाहिलं? तो मंत्र पाहिला, त्याचं सामथ्र्य पाहिलं. तशी चाल दिसली पाहिजे. म्हणून आमच्या संगीतामध्ये, याची गाण्याची नजर अजून चांगली नाही आहे, असं म्हणतात. गाण्याला गळा लागतो हे माहिती आहे, श्वास लागतो हे माहिती आहे, पण गाण्याला मुख्य लागते ती नजर! ती नजर म्हणजे सामान्य दृष्टीला दिसणारी नजर नव्हे. सुरांच्या पोटात शिरून त्यांची काय किंमत आहे, कुठे ते उभे करावे, काय करावं हे सबंध चित्र डोळ्यापुढे दिसायची समज.      – श्रीनिवास खळे यांच्यासंदर्भात केलेल्या भाषणातून

चरण स्पर्श!

तू मायन्यात ‘चरणस्पर्श’ केल्यामुळे मी चाट झालो. वयाने लहान असल्यामुळे तुला मी चरणस्पर्श म्हणू शकत नाही आणि तुझ्या लक्षावधी गीतांपैकी एकाही चरणाला स्पर्श करावा, असा गळा देवाने मला न देता नुसताच घसा दिला आहे! पूर्वीचे राजे मुलूख पादाक्रांत करायचे, तू सारे जग ‘पदाक्रांत’ केले आहेस. हे तुझे सार्वभौमत्व चिरकाल टिको ही शुभेच्छा!        – लता मंगेशकर यांना लिहिलेल्या पत्रातून

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: P l deshpande
Show comments