३५ वर्षे सातत्याने आनंदवनात येणारे पुलं आजही आमच्या रोमारोमात आहेत, अशी भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली. ‘पु. ल. परिवार’ आणि ‘आशय सांस्कृतिक’च्या वतीने आयोजित पुलोत्सवात आज ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांना  बालगंदर्व रंगमंदिरात ज्येष्ठ समाजसेवक आणि लेखक डॉ. अनिल अवचट यांच्या हस्ते कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रूपये २५००० असे या सन्मानाचे स्वरूप आहे. यावेळी आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार, स्क्वेअर वनचे नयनीश देशपांडे, पिनॅकल ग्रुपचे गजेंद्र पवार, कॉसमॉस बॅंकेंचे अध्यक्ष मिलिंद काळे, कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. विकास आमटे म्हणाले की, ‘पुलंमुळे साहित्य, संगीत, कला अशा विविध क्षेत्रातील मंडळी आनंदवनात येऊ लागली. आमच्या कुष्ठरूग्णांच्या विविहाला पुरोहित म्हणून गोनिदा येत, तर वऱ्हाडी म्हणून पुलं, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, विश्राम बेडेकर, तीर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्राचार्य राम शेवाळकर या दिग्गजांची हजेरी लागत असे, ही आठवण आज पुन्हा जागृत झाली. यांच्यामुळे संस्थानिकांपेक्षा जास्त दणक्यात आमच्या कुष्ठरूग्णांचे विविह पार पडले, असे म्हटले तर वावगे ठरू नये. या सगळ्या मंडळींच्या गप्पा आणि चर्चा म्हणजे अठरा-अठरा, बावीस-बावीस तासांच्या मैफली असत. या सगळ्यांमुळे आनंदवनाचे काम सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यास खूप मोठा हातभार लागला.’