पिंपरी महापालिकेची स्वच्छता मोहीम सुरू आहे. स्मार्ट सिटी अभियानात स्वच्छताविषयक कामांना प्राधान्य देण्याचे धोरण आहे. मात्र जागोजागी थाटलेल्या पान टपऱ्यांकडून स्वच्छतेला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे. बहुतांश टपऱ्यांच्या जागा म्हणजे अस्वच्छतेचे आगार बनल्या आहेत.
पालिकेने सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेंतर्गत रस्त्यावर अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येते. केंद्र सरकारने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत लागू करण्यात आलेल्या नियमांचा आधार घेत १५ नोव्हेंबरपासून ही मोहीम सुरू केली. सार्वजनिक ठिकाणी, थुंकणे, उघडय़ावर लघुशंका करणे, शौचास बसणे आदींबाबत कारवाई करण्यात येते. रस्त्यावर घाण केल्यास १८० रुपये, थुंकल्यास १५० रुपये, लघुशंका केल्यास २०० रुपये, शौचास बसल्यास ५०० रुपये दंड आकारण्यात येतो. याखेरीज, दुभाजक, सिनेमागृह, सर्व प्रमुख चौक, व्यावसायिक इमारती, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी अस्वच्छता दिसल्यास कारवाई करण्यात येते. पानटपऱ्या चालकांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते. मोठय़ा हॉटेलबाहेर, प्रमुख चौकांमध्ये, अरुंद बोळांमध्ये, पदपथावर अशा विविध ठिकाणी थाटलेल्या पानटपऱ्यांमध्ये शेकडो नागरिकांचा राबता असतो. पान, तंबाखू खाऊन तेथेच थुंकण्यामुळे अस्वच्छता होत असतानाही पान टपऱ्या व परिसराची स्वच्छता केली जात नाही, असे दिसून येते.
पानटपरी चालकांना स्वच्छता राखण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार अलीकडे बरीच सुधारणा दिसून येत आहे. अस्वच्छता आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
– दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी पालिका