Pahalgam Attack दहशतवाद हा काय असतो, हे आम्ही डोळ्यांना पाहिलंय, अनुभवलंय आणि सोसलंय. दहशतवाद्यांचा द्वेष काय असतो, याचा अनुभव आम्ही घेतला. आम्ही त्यांच्यासमोर हात जोडलेत. त्यामुळे राजकारण्यांनी कृपा करुन आमच्या भावनांशी खेळू नये. किमान माणुसकी म्हणून आणि आम्ही काय भोगलंय याचा विचार राजकारण्यांनी करावा, अशी विनंती पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या पत्नीने केली आहे. पहलगाम या ठिकाणी मागच्या मंगळवारी म्हणजेच २२ एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. २६ पर्यटकांपैकी ६ पर्यटक हे महाराष्ट्रातले होते. या सगळ्याच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

संतोष जगदाळेंच्या पत्नी काय म्हणाल्या?

“मी अजूनही त्या धक्क्यातच आहे. डोळे बंद केले तरीही रायफल घेतलेला माणूसच दिसतो. मागच्या आठ दिवसात मी झोपलेच नाहीये. लोकांनी आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे. रविवार होता की सोमवार हेदेखील कळत नाही. आम्ही अजूनही मनाने पहलगामला आहोत. मी त्या धक्क्यातून सावरु शकलेले नाही. आमचा जो लॉस झाला आहे तो कुणीही भरुन काढू शकत नाही. मला ते शब्दांत मांडता येणार नाही. मला भयंकर भीती वाटते. मी अडीच वाजता उठून बसले मला वाटलं की कुणीतरी रायफल घेऊन फिरतं आहे. मी घाबरुन बाहेर आले, मला खूप भीती वाटते असं संतोष जगदाळेंच्या पत्नी म्हणाल्या.

आमच्या भावनांशी खेळू नका-संतोष जगदाळेंच्या पत्नीची विनंती

“माझी एक विनंती आहे सगळ्यांनाच की आमच्या या सगळ्या भावनांचा पॉलिटिकल इश्यू करु नका. आमच्या भावनांशी खेळू नका. आम्ही तो अनुभव घेतला आहे. आमचं दुःख रंगवून सांगू नका. आमचा माणूस आमच्या समोर बोलून मारला आहे. आम्ही सगळं सांगितलं आहे. ते (दहशतवादी) निवांत मारायलाच आले होते. दहशतवाद हा शब्द आम्ही अनुभवला आहे, जगला आहे. त्यांनी त्वेषाने बोललली वाक्यं ऐकली आहेत. माझे मिस्टर आणि माझे दीर माझ्या डोळ्यांसमोर पडलेले दिसतात. त्यांचे मेंदू बाहेर आले होते तो प्रसंग माझ्या समोरुन गेलेला नाही. आम्ही भयंकर स्थितीला सामोरं गेलो आहोत. माणुसकी बाळगा आणि सगळ्या राजकारण्यांना हे सांगते आहे की आमच्या भावनांशी खेळू नका. आम्ही कुठल्या मानसिकतेतून जात आहोत याचा माणुसकी म्हणून विचार करा. कुणीही स्टेटमेंट करणं सोपं आहे. कुणी आम्हाला खोटं पाडू नका. लहान मुलांनीही तेच सांगितलं आहे. आमच्या मनाशी खेळू नका. आपल्या राज्यातले राजकारणी आहेत, त्यांना आपलं मानतो त्यांनी असं करु नये.” असंही संतोष जगदाळेंच्या पत्नी म्हणाल्या. एबीपी माझा या वाहिनीशी त्यांनी संवाद साधला आहे. त्यावेळी त्यांनी ही विनंती केली.