पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या दोन पर्यटकांचा मृत्यू झाला असून, प्रगती आणि आसावरी जगदाळे जखमी झाल्या आहेत. संतोष जगदाळे आणि जखमी महिला पर्यटक एकाच कुटुंबातील आहेत. जगदाळे आणि गनबोटे यांचे मृतदेह विशेष विमानाने आणण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर आज, गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यातून जम्मू-काश्मीरमध्ये विविध ठिकाणी एकूण ५२० पर्यटक फिरायला गेले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाली आहे. उर्वरित पर्यटक सुखरूप असून, त्यांना पुण्यात परत आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन सुरू झाले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पुणे आणि जिल्ह्यातून काही पर्यटक स्वतंत्रपणे, तर काही सहल नियोजन करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले आहेत. त्यांची माहिती मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी रात्रीच हेल्पलाइन सेवा सुरू केली होती. या हेल्पलाइनवर आलेल्या दूरध्वनींनुसार, शहर आणि जिल्ह्यातील एकूण ५२० पर्यटक गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे.

शहरातील जगदाळे आणि गनबोटे कुटुंबीय एकत्रित पर्यटनासाठी गेले होते. त्यांपैकी संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गनबोटे या दोघांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. संतोष जगदाळे यांची पत्नी प्रगती आणि कन्या आसावरी या किरकोळ जखमी झाल्या आहेत. उर्वरित सर्व पर्यटक सुखरूप असून, त्यांच्याशी संपर्क साधण्यास जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. त्यांना पुण्यात आणण्यासाठीचेही नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख विठ्ठल बनोटे यांनी दिली.

जगदाळे आणि गनबोटे मित्र

जगदाळे आणि गनबोटे हे मित्र असून, दोघेही व्यावसायिक आहेत. चार दिवसांपूर्वी ही दोन्ही कुटुंबे विमानाने काश्मीरला गेली होती. जगदाळे कर्वेनगर येथे, तर गनबोटे कोंढवा बुद्रुक येथील रहिवासी आहेत. दोघांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर कर्वेनगर आणि कोंढवा परिसरात शोककळा पसरली. जगदाळे यांचा गनबोटे यांच्यासमवेत फरसाण विक्रीचा व्यवसाय होता. जगदाळे कर्वेनगर येथील ज्ञानदीप काॅलनीत गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून वास्तव्यास होते. त्यांचे नातेवाईकही याच इमारतीमध्ये राहत आहेत. बुधवारी या परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

विशेष विमानाने मृतदेह पुण्यात

जगदाळे यांची कन्या आसावरी आणि जगदाळे यांचे बंधू अविनाश आणि अजय तसेच गनबोटे यांचे बंधू अभिजीत यांच्यासमवेत राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी संपर्क साधला. जगदाळे आणि गनबोटे यांचे मृतदेह गुरुवारी पहाटे विशेष विमानाद्वारे पुण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या दोघांची अंत्ययात्रा सकाळी निघणार असून, त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेल्पलाइन क्रमांक : ०२०-२६१२३३७१, ९३७०९६००६१, ८९७५२३२९५५, ८८८८५६५३१७

शहर आणि परिसरातून पाचशेपेक्षा जास्त पर्यटक काश्मीरला गेल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. त्यांपैकी दोघांचा मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह विशेष विमानाने पुण्यात आणण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

विठ्ठल बनोटे, आपत्ती व्यवस्थापन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय