अवर्षणामुळे उजनी धरणात पाणी नसल्याने चित्रबलाक या पाहुण्या पक्ष्यांनी सलग तीन वर्षे ‘उजनी’कडे पाठ फिरवली होती. मात्र, या वर्षी उजनी धरणात १०० टक्के पाणीसाठा झाल्याने उजनीच्या विस्तीर्ण जलाशयावर चित्रबलाक पक्ष्यांचे एक महिनाअगोदर आगमन झाले आहे.
उजनीच्या पाणवठय़ावर आता बकुळ कुलातील अनेक जाती प्रजातीच्या पक्ष्यांसह चित्रबलाक गर्दी करू लागल्याने उजनीकाठी आता हिवाळय़ाची चाहूल लागली आहे.
उजनी धरणात पाणी अडण्यास प्रारंभ झाल्यापासून गेली ३०-३५ वर्षे येथे परदेशातून रोहित, चित्रबलाक आदी पक्षी मोठय़ा संख्येने येतात. मात्र, महाराष्ट्राच्या काही भागात गेली सलग तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती होती. राज्यातील अनेक पाणीसाठे आटल्याने व उजनी धरणाने गतवर्षी गेल्या पस्तीस वर्षांतील नीच्चांक पातळी गाठल्याने स्थलांतरित पाहुण्या पक्ष्यांनी उजनीकडे पाठ फिरवली होती. मात्र या वर्षी उजनी धरण १०० टक्के भरल्याने मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा व उथळ पाण्यात या पक्ष्यांचे खाद्य मोठय़ा प्रमाणात सापडत असल्याने या पक्ष्यांनी उजनीच्या परिसरात गुलाबी थंडी पडण्यापूर्वीच आगमन केले आहे.
दरवर्षी साधारण डिसेंबर-जानेवारीच्या दरम्यान हे पक्षी येथे वास्तव्यास येतात. मात्र या वर्षी आॅक्टोबर महिन्यातही या पक्ष्यांचे थवे उजनीच्या जलाशयावर मोठय़ा संख्येने दिसू लागले आहेत. इंदापूर येथील तहसील कार्यालयाच्या आवारात त्यांचे वसतिस्थान आहे. येथेच त्यांचा विणीचा हंगाम होतो. त्यांची पिल्ले उड्डाणक्षम होतात. ती मार्च-एप्रिलच्या दरम्यान निघून जातात. उजनीच्या परिसरात भादलवाडी येथेही त्यांची मोठी वसाहत होते. मात्र तेथेही गतवर्षी पक्षी पाणी नसल्याने आले नाहीत.
पक्ष्यांच्या आगमनावर शेतकऱ्यांचे आडाखे
गेल्या पस्तीस वर्षांच्या त्याच्या हालचाली व येण्या-जाण्याच्या वेळांनुसार उजनी काठच्या शेतकऱ्यांचे आडाखे ठरतात. ज्या वर्षी नेहमीप्रमाणे ७ जूनला पाऊस चांगला सुरू होऊन मान्सून सतत सक्रिय असतो, त्या वेळी हे पक्षी मे महिन्याच्या अखेरीस उजनीवरून उड्डाण करतात, तर ज्या वर्षी पाऊस कमी प्रमाणात असेल किंवा पडणार नाही, त्या वर्षी ऑगस्टपर्यंत हे पक्षी उजनीच्या पाणवठय़ावर आढळतात, असा अनुभव येथील शेतकरी सांगतात. उजनीकाठी चित्रबलाक, रोहित तसेच, राखी बगळे, पाणकावळे, विविध बगळे अशा पक्ष्यांची संख्याही मोठी आहे.
उजनी जलाशयावर चित्रबलाकांचे वेळेआधीच आगमन
या वर्षी उजनी धरणात १०० टक्के पाणीसाठा झाल्याने उजनीच्या विस्तीर्ण जलाशयावर चित्रबलाक पक्ष्यांचे एक महिनाअगोदर आगमन झाले आहे.
First published on: 07-11-2013 at 02:43 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Painted storks comes on ujani dam