पुणे : रंग-रेषांच्या सहाय्याने कुंचल्याचा सहजसुंदर आविष्कार घडविणारे आणि समाजामध्ये सौंदर्यवादी दृष्टिकोन विकसित व्हावा यासाठी तळमळीने कार्यरत राहणारे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रांत त्यांनी विपुल काम केले होते.
मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे परांजपे यांना ३० मे रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोमानामुळे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. परांजपे यांचे पार्थिव दुपारी मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी परांजपे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमध्ये रवी परांजपे यांनी संशोधनपर लेखन केले होते. त्यांचे ‘ब्रश मायलेज’ हे आत्मकथन तसेच परदेशी चित्रकारांचा परिचय करून देणारे ‘शिखरे रंग-रेषांची’ हे पुस्तक गाजले. ‘नीलधवल ध्वजाखाली’ हे लेखसंग्रहावर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे.
परांजपे यांना ‘कम्युनिकेशन आर्ट्स गिल्ड’चा (कॅग) ‘हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांच्या ‘द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला २०१२ मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. दयावती मोदी प्रतिष्ठानतर्फे दयावती मोदी हा कला क्षेत्रातील पुरस्कार लाभला होता. तसेच ‘ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तर, ‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता.
रंगमाध्यमांवर प्रभुत्व..
परांजपे यांनी व्यक्तिचित्रे, समूहचित्रे, निसर्गचित्रे, स्थिरचित्रे अशा विविध चित्रप्रकारांत काम केले. तसेच सर्वच रंगमाध्यमांवर प्रभुत्व असल्यामुळे प्रचलित पद्धतीपेक्षा वेगळय़ा पद्धतीने माध्यमांची हाताळणी करून त्यांनी सातत्याने अभिव्यक्ती करीत स्वत:ची अशी एक प्रतिमा निर्माण केली.