पुण्याच्या बावधन मध्ये पाकिस्तानी चलनातील नोट सापडली आहे. यामुळं पिंपरी- चिंचवड पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. बावधन मधील एका उच्चभ्रू सोसायटीच्या लिफ्ट जवळ पाकिस्तानी चलनातील नोट सापडली. पाकिस्तानच्या नोटेमुळे हे प्रकरण थेट पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बावधन पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं.
घटनेनंतर ८४ फ्लॅट असलेल्या सोसायटीमधील प्रत्येकाची पोलीस चौकशी करत आहेत. पाकिस्तानी चलनातील ही नोट कोणी आणली आणि कशासाठी आणली याबाबत आता चौकशी सुरू आहे. तसेच या सोसायटीमधील कुठली व्यक्ती पाकिस्तानमध्ये जाऊन तर आला नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. सोसायटी मधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे पोलिसांच्या तपासाला अडथळा निर्माण होत आहे. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर ही पाकिस्तानी चलनातील नोट कोणाच्या खिशामधून पडली हे समजू शकलं नाही. याबाबत अद्याप पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही.