पंढरपूरची आषाढी वारी पंधरा दिवसांवर आल्यामुळे पालखीबरोबर प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. पालखी मार्गावरील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे शुद्धीकरण, टँकरद्वारे पाणीपुरवठा, हॉटेल व्यावसायिकांना सूचना देणे आणि वैद्यकीय पथके तयार करण्याची कामे सध्या धामधुमीत आहेत.
८ जुलैपासून पालखी सोहळ्याला सुरूवात होत आहे. यात पुणे जिल्ह्य़ात पालख्यांचा मुक्काम १२ दिवस आहे. पालखी मार्गावर दुतर्फा २ किलोमीटरच्या अंतरात असलेल्या आणि वारकरी ज्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करु शकतील अशा पाणीस्त्रोतांची यादी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या मार्गावर पुणे जिल्ह्य़ात एकूण ३,६२० पाणीस्रोतांची यादी करण्यात आल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. एच. एच. चव्हाण यांनी सांगितले. दूषित पाण्यामुळे होणारे गॅस्ट्रो, टायफॉईड आणि कॉलरासारखे रोग टाळण्यासाठी या पाणीस्रोतांचे शुद्धीकरण सुरू आहे. पालखीबरोबर चालताना वारकऱ्यांसाठी पाणी टँकर पुरवले जाणार असून दोन्ही पालख्यांबरोबर ५० ते ५५ टँकर जाणार आहेत. पुणे जिल्ह्य़ात पालखी मार्गावर एकूण ८३१ हॉटेल्स आणि खाणावळी आहेत. ४ जुलैपासून या हॉटेलमधील पाण्याचे दररोज शुद्धीकरण करण्याचे ठरले आहे.
पुण्यात दोन्ही पालख्यांच्या मार्गावर प्रत्येकी दोन फिरती वैद्यकीय पथके जाणार असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले. मार्गावर प्रत्येक २ किलोमीटर अंतरावर ‘अँब्युलन्स पाँईंट’ तयार करण्यात आले आहेत. तर अत्यावश्यक सेवेच्या १०८ क्रमांकाच्या २ रुग्णवाहिका सुरूवातीपासून शेवटपर्यंत सतत पालख्यांबरोबर राहणार आहेत. पालखीत सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिंडीच्या प्रमुखाला किरकोळ औषधांचे एक किट देण्यात येणार असून यात अंगदुखी, थंडी- ताप, जुलाब अशा किरकोळ आजारांसाठीची औषधे असतील, असेही डॉ. चव्हाण म्हणाले.

Story img Loader