आळंदीहून पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची वारी आनंददायी आणि सुरक्षित व्हावी यासाठी यंदा ‘पालखी सेवा, पुणे’ हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे. पुणे महापालिका, दहा सेवाभावी संघटना आणि पाचशेहून अधिक युवक एकत्र येऊन हा उपक्रम करणार आहेत. वारकऱ्यांना सर्वप्रकारचे साहाय्य करण्यासाठी पुण्यात वारकरी मित्र पुढे आले असून, खास मोबाइल अॅप आणि संकेतस्थळ ही या उपक्रमाची वैशिष्टय़े आहेत.
पुण्यात पालख्यांचा मुक्काम दोन दिवस असतो आणि तिसऱ्या दिवशी पालख्या मार्गस्थ होतात. या काळात महापालिकेतर्फे वारकऱ्यांना अधिकाधिक सेवासुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यासाठी शेकडो कर्मचारी व अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते तसेच विविध कामांवर लाखो रुपये खर्चही केले जातात. मात्र, या कामांमध्ये समन्वय नसतो. या विस्कळीतपणामुळे मोठय़ा प्रमाणावर यंत्रणा उपलब्ध असूनही उणिवा राहतात. या सर्व सेवांचे योग्य व्यवस्थापन केले, तर वारकऱ्यांना उत्तमप्रकारे सेवा देणे शक्य आहे, या विचाराने महापौर चंचला कोद्रे यांनी पुढाकार घेतला आणि पुण्यातील अनेक संस्थांनी या उपक्रमात सहभागी होण्याची तयारी दर्शवली. त्यातूनच पालखी सेवा, पुणे हा उपक्रम यंदा सुरू होत आहे.
नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटीज, विवेकवारी, यूथ इनिशिएटिव्ह, युनिटी, मराठवाडा हितकारिणी सभा, हास्य क्लब, इंडियन डेंटल असोसिएशन, संतुलन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह, राष्ट्रीय सेवा योजना, आकांक्षा आदी अनेक संस्था, संघटना या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. पुणे शहरात वारकऱ्यांचा मुक्काम यंदा एकशेपंधरा शाळांमध्ये असेल. त्या ठिकाणी वारकरी मित्र थांबणार असून वारकऱ्यांना ज्या ज्या सुविधांची आवश्यकता असेल, त्या सुविधा पुरवण्यासाठी ते महापालिकेची यंत्रणा आणि वारकरी यांच्यात समन्वयक म्हणून काम पाहतील.
वारकरी सेवेचा एक भाग म्हणून मोबाइल अॅप विकसित करण्यात आले असून, त्या माध्यमातून महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि वारकरी मित्र यांच्यात समन्वय राखला जाईल. याबरोबरच वारीतील सेवांसंबंधीची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यातून वारीचीही माहिती जावी या हेतूने संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळाचे उद्घाटन महापौर कोद्रे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. श्यामल देसाई, सचिन पवार, डॉ. सिद्धार्थ ओसवाल, सोमेश गीते, संदीप मराठे, राहुल वंजारी हे विविध संस्थांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
वारी आनंदाची..
आळंदीहून पंढरीला जाणाऱ्या वारकऱ्यांची वारी आनंददायी आणि सुरक्षित व्हावी यासाठी यंदा ‘पालखी सेवा, पुणे’ हा अभिनव उपक्रम सुरू होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-06-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Palkhi alandi pmc mayor