श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेध पुण्यालाही लागले असून शनिवारी पालखी मार्गाची पाहणी करून महापौर चंचला कोद्रे यांनी आवश्यक कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
महापौर चंचला कोद्रे, स्थायी समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, सहआयुक्त सुरेश जगताप, ज्ञानेश्वर मोळक, माधव जगताप यांच्यासह स्थानिक सर्व नगरसेवक या पाहणीच्या वेळी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यानंतर पालखी सोहळा तयारीच्या दृष्टीने महापालिकेत सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. महापौर तसेच सभागृहनेता सुभाष जगताप, आयुक्त विकास देशमुख, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र जगताप यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि अन्य संबंधित अधिकारी बैठकीत उपस्थित होते. पालखी मार्गावरील स्वच्छता, पदपथांची दुरुस्ती, राडारोडा उचलणे, योग्यप्रकारे स्वागत कमानी उभारणे तसेच मुक्कामाच्या ठिकाणी कराव्या लागणाऱ्या विविध व्यवस्था याबाबत बैठकीत चर्चा होऊन आदेश देण्यात आले.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी ज्या सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत त्याबाबतही चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. पालखीच्या मार्गावर स्वागत कक्ष उभारणे, मार्गदर्शक फलक लावणे, दिव्यांची व्यवस्था, ध्वनिवर्धक व्यवस्था, पिण्याचे पाणी, महापालिका शाळांची व्यवस्था आदींबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. पालखी सुरक्षिततेच्या दृष्टीने पालखी मार्गावर तसेच मुक्कामाच्या ठिकाणी सीसी टीव्ही बसवण्याचीही सूचना या वेळी देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा