Ashadhi Ekadashi Wari Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala Alandi पुणे : ‘पाहू द्या रे मज विठोब्बाचे रूप’ असे म्हणत टाळ-मृदंगाच्या तालावर विठ्ठलनामाचा गजर करत आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा रविवारी (११ जून) दुपारी चार वाजता प्रस्थान ठेवणार आहे.
पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी जमली असून अलंकापुरी सज्ज झाली आहे. रविवारी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरवात होणार असून, माऊलींचा पालखी सोहळा गांधी वाडा येथील आजोळघरी आळंदी मुक्कामी असेल. सोमवारी (१२ जून) सकाळी पालखी सोहळ्याची पुण्यनगरीकडे वाटचाल सुरू होईल.
हेही वाचा >>>Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023 देहू: जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
अंकली (जि. बेळगाव) येथून सदार ऊर्जितसिंह शितोळे यांच्याकडून माऊलींचे मानाचे अश्व आळंदी मुक्कामी पोहोचले आहेत. माऊलींच्या रथाला नवी झळाळी देण्यात आली आहे. दोन दिवसांपासूनच अलंकापुरीत आषाढी वारीच्या पालखी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची गजबज सुरू झाली आहे. इंद्रायणीचे दोन्ही काठ भाविकांच्या मांदियाळीने फुलून गेले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून वारकरी आळंदीकडे येत आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या वतीने वारकऱ्यांसाठी जादा फेऱ्या करण्यात येत आहेत. आषाढी वारीचे मानकरी, सेवेकरी, वीणेकरी, टाळकरी यांचे आगमन अलंकापुरीत झाले आहे. आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवण्याचा मंगल सोहळा अनुभवण्यासाठी वारकऱ्यांप्रमाणेच नागरिकांचीही गर्दी जमू लागली आहे. प्रशासनाच्या वतीने आळंदीमध्ये विविध यंत्रणा सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. महावितरण, पाणीपुरवठा विभाग, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभागाची विविध पथके कार्यान्वित झाली आहेत. मोठ्या संख्येने फिरत्या स्वच्छतागृहांची सोय करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>देहू: यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडावा, बळीराजाचे तुकोबांना साकडे
असा असेल प्रस्थान सोहळा
- पहाटे पाचपासून धार्मिक विधींना प्रारंभ
- सात वाजल्यापासून दर्शनबारी भाविकांसाठी खुली
- दुपारी बारा वाजता महानैवेद्य
- काल्याचे कीर्तन
- माऊलींच्या पादुकांची प्रदक्षिणा
- समाधी मंदिरात महापूजा
- सायंकाळी चारच्या सुमारास प्रस्थान सोहळ्याला सुरुवात