आकर्षक रंगरंगोटी आणि निसर्ग उद्यानही

पुणे : आकर्षक रंगरंगोटी आणि निसर्ग उद्यानाच्या माध्यमातून पुणे रेल्वेच्या उरुळी रेल्वे स्थानकाचा चेहरा-मोहरा बदलण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी वारी आणि पालखी सोहळाही चित्रांतून साकारण्यात आला आहे.

रेल्वेच्या वाणिज्य आणि अभियांत्रिकी विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे मध्य रेल्वेचे व्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनी कौतुक केले. स्थानकाच्या मुख्य इमारतीवर पालखी सोहळय़ासोबत वारीला निघालेल्या वारकऱ्यांची चित्रे साकारण्यात आली आहेत. टाळ-मृदंगाचा गजर आणि खांद्यावर भागवत धर्माची पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांमुळे पालखी सोहळय़ाचे दर्शन होते. स्थानकातील पादचारी पूल, प्रतीक्षालयातील िभती आदींवरही सुंदर कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे स्थानकाच्या आवारात निसर्ग उद्यानही साकारण्यात आले आहे. त्यात टाकाऊ वस्तूंचा कलात्मक वापर करण्यात आला आहे. उद्यानात काही औषधी वनस्पतीही लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्थानकाच्या सौंदर्यात भर पडली आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक सुनील मिश्रा, वरिष्ठ विभागीय अभियंता पीयूष चतुर्वेदी, नरसिंग यादव, गौतम मुसळे, सहायक विभागीय् अभियंता रवींद्र कुमार सिंह, मुख्य वाणिज्य निरीक्षक माधव राव आणि वाणिज्य, अभियांत्रिकी विभागाच्या पथकाने संयुक्तपणे हा उपक्रम पूर्णत्वास नेला.

Story img Loader