महापालिकेने मंजूर केलेल्या विकास आराखडय़ात पाषाण येथील पंचवटी परिसरात प्रस्तावित करण्यात आलेल्या बोगद्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार असल्यामुळे बोगद्याच्या मार्गात बदल करावा, अशी मागणी पंचवटी उत्कर्ष सेवा संस्थेतर्फे महापालिकेकडे करण्यात आली आहे.
संस्थेचे अध्यक्ष दि. ना. मंडलेकर आणि सचिव एन. टी. जाधव यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. महापालिकेने जुन्या हद्दीसाठी तयार केलेल्या विकास आराखडय़ात गोखलेनगर आणि कोथरूड, पौड रस्ता येथून दोन बोगदे पाषाण रस्त्यावरील पंचवटीपर्यंत प्रस्तावित करण्यात आले आहेत. या दोन्ही रस्त्यांची प्रस्तावित रुंदी शंभर फूट असून बोगद्याचे रस्ते पंचवटीमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या चाळीस फुटी रस्त्याला जोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अस्तित्वातील रस्त्यांचे रुंदीकरण करावे लागेल. त्यामुळे टेकडय़ांचा दीड किलोमीटरचा भाग फोडावा लागणार असून टेकडय़ा फोडण्याबरोबरच पाच ते सहा हजार झाडे तोडावी लागणार आहेत. महापालिकेने या भागात ज्या विविध पायाभूत सेवा-सुविधा निर्माण केल्या आहेत, त्याही नष्ट होण्याची भीती आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा निधी वाया जाईल, असे मंडलेकर यांनी सांगितले.
वाहतूक समस्या सोडविण्यासाठी बोगद्यांचा जो प्रस्ताव विकास आराखडय़ात मांडण्यात आला आहे त्याला आमचा विरोध नाही. मात्र, सध्याच्या रचनेत बदल करून बोगदे करावेत, अशी संस्थेची मागणी आहे. पंचवटीऐवजी अभिमानश्री सोसायटी येथे जाणाऱ्या रस्त्याला बोगदा जोडल्यास टेकडी फोडावी लागणार नाही तसेच खर्चातही बचत होईल, असे सांगण्यात आले.
पाषाण, पंचवटी परिसरात एकवीस सोसायटय़ा असून पंचवटी उत्कर्ष सेवा संस्था ही या संस्थांची शिखर संस्था आहे. या सर्व सोसायटय़ांचा या प्रस्तावाला विरोध आहे. तसेच विकास आराखडय़ाला ज्या वेळी हरकती नोंदवायच्या होत्या त्या वेळी प्रस्तावित योजनेबाबत हरकतीही नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात आले.
रस्त्यासाठी पाषाण येथील पंचवटीतील सध्याच्या प्रस्तावित बोगद्याला विरोध
पाषाण येथील पंचवटी परिसरात प्रस्तावित बोगद्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार असल्यामुळे बोगद्याच्या मार्गात बदल करावा, अशी मागणी पंचवटी उत्कर्ष सेवा संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
First published on: 03-08-2013 at 02:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchavati utkarsha seva sanstha opposes tunnel through panchavati