पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजयी होण्यासाठी आता भारतीय जनता पक्षाने आगामी नगरपंचायतीच्या निवडणुकांवरही लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. बारामती तालुक्यातील माळेगांव नगरपंचायतीचे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन ही निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढणार आहे. त्यामुळे भाजपच्या मिशन बारामतीची सुरुवात नगरपंचायतीच्या निवडणुकीपासूनच सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : Maharashtra News Live : राज्यातील सत्तासंघर्षावर आजही निर्णय नाहीच; महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीच्या जागेवर भाजपने दावा केल्याची माहिती खोटी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे गोविंद बाग निवासस्थान, माळेगांव साखर कारखाना आणि शिवनगर विद्या प्रसारक मंडळ नगरपंचायतीच्या हद्दीत येतात. माळेगांव साखर कारखान्याची ओळख ही पवारांचा घरचा साखर कारखाना अशी आहे. गेली कित्येक वर्ष पवार कुटुंबीयांच्या ताब्यात असलेला माळेगांव कारखाना शरद पवार विरोधी रंजन तावरे गटाने ताब्यात घेतला होता. मात्र कारखान्याची सत्ता पुन्हा पवार कुटुंबीयांनी खेचून आणली. गेल्या काही दिवसांपूर्वी माळेगाव ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये करण्यात आले. ग्रामपंचायत असतानाही बारामती तालुक्यातील सर्वाधिक मोठी ग्रामपंचायत माळेगाव होती. आता नगरपंचायतीमध्ये रूपातंतर झाल्यानंतरही ती तालुक्यातील सर्वात मोठी नगरपंचायत ठरली आहे. या नगरपंचायतीची निवडणूक येत्या काही दिवसांत होणार असून राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकीचा कार्यक्रमही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. माळेगांव नगरपंचायतचे हे राजकीय महत्त्व लक्षात घेऊन आता माळेगांव नगरपंचायत ताब्यात घेण्याचा निश्चय भारतीय जनता पक्षाने केला आहे. विशेष म्हणजे भाजपच्या मिशन बारातमीच्या विजयाची सुरुवात माळेगांव नगरपंचायतीवर कमळ फुलवण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जान आणण्यासाठी माळेगांव नगरपंचायतीवर कमळ फुलले तर तातडीने पाच कोटींचा विकासनिधी दिला जाईल, असे बावनकुळे यांनी सांगितले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने माळेगाव बारामती तालुक्यात मोठे गाव आहे. त्यामुळे लोकसभा निवडणूक, विधानसभा तयारीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माळेगावात बुथ कमिटीतील कार्य़कर्त्यांची बैठक घेतली. विधानसभा, लोकसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात पवार कुटुंबीयांकडून काटेवाडी येथून केली जाते. ही बाब लक्षात घेऊन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याही बारामती दौऱ्याची सुरुवात काटेवाडी पासून झाली. काटेवाडी येथील कन्हेरी मंदिराला भेट देऊन बावनकुळे यांनी काटेवाडी येथे भाजप कार्यकर्त्यांशीही संवादही साधला.

राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडविणे खूपच सोपे झाले आहे. भारतीय जनता पक्षाला लोकांचा वाढता पाठिंबा आहे. ही बाब लक्षात घेऊन यापुढील काळात होणाऱ्या निवडणुका जिंकायच्या आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीबरोबरच माळेगाव नगरपंचायत आणि तालुक्यातील अन्य नगरपंचायतीं जिंकायच्या आहेत, असे बावनकुळे यांनी या बैठकीत सांगितले. माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत कमळ फुलविण्यासाठी कार्य़कर्त्यांनी प्रामाणिकपणे कृती आराखडा अमलात आणण्याचा आणि त्यामध्ये तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांनीही योगदान देण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. त्यामुळे भाजपच्या मिशन बारामती विजयाची सुरुवात माळेगांव नगरपंचायतीपासून होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchayat development fund mission baramati started malegaon nagar panchayat pune print news ysh
Show comments