महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या परिवाराची कुलस्वामिनी असलेली कार्ला गडावरील श्री एकवीरा देवीचे स्वयंभू मंदिर मावळ तहसीलदारांनी अनधिकृत ठरविले आहे. त्यामुळे भाविकांमध्ये खळबळ उडाली असून त्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मावळच्या तहसीलदारांनी याबाबत एक महिन्यांच्या आत जाहीर खुलासा करून भाविकांची माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत तरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिला.
ट्रस्टचे उपाध्यक्ष मदन भोई, सचिव संजय गोविलकर, खजिनदार नवनाथ देशमुख, विश्वस्त काळूराम देशमुख आदी त्या वेळी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार मावळ तहसीलदांनी मावळातील काही मंदिरांची यादी प्रसिद्ध करून ती अनधिकृत असल्याचे म्हटले होते. त्यामध्ये पांडवकालीन असलेल्या कार्ला लेणीच्या गुंफेतील एकवीरा देवीच्या मंदिराचा समावेश करण्यात आल्याने भाविकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
याबाबत तरे म्हणाले, कार्ला मंदिर प्राचीन आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या नोंदणीमध्ये हे मंदिर असताना तहसीलदारांनी ते अनधिकृतच्या यादीत टाकणे ही बाब अनाकलनीय आहे. या देवीची वर्षांत दोन वेळा मोठी यात्रा भरते व तिचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी पुणे यांच्यासह सर्व शासकीय यंत्रणा कार्यरत असते. किमान याचा विचार अनधिकृतच्या यादीत मंदिराचा उल्लेख करताना व्हायला हवा होता. श्री एकवीरा देवी मंदिर अनधिकृत असल्याची घोषणा तातडीने मागे घेत तहसीलदारांनी भाविकांची माफी मागत खुलासा करावा.
वनविभागाच्या अहवालावरून यादी प्रसिद्ध
‘‘कार्ला डोंगरावरील श्री एकवीरा देवीचे मंदिर हे वन विभागाच्या हद्दीत असून त्यांनी दिलेल्या अहवालावरून हे मंदिर अनधिकृतच्या यादीत आले आहे. मात्र तसे असले, तरी हे मंदिर नियमित करण्यात येणार आहे, किंबहुना यादीमधील बहुतांश मंदिरे नियमित करणार आहे.’’
– शरद पाटील, तहसीलदार, मावळ

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा