हस्तलिखितांचे अभ्यासक वा. ल. मंजूळ यांचे कार्य
वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ असा बहुमान असलेल्या श्री क्षेत्र पंढरपूरमधील मठ, फड आणि दिंडय़ांचा इतिहास प्रथमच ग्रंथबद्ध झाला आहे. प्राचीन हस्तलिखितांचे ज्येष्ठ अभ्यासक वा. ल. मंजूळ यांनी एका प्रकल्पांतर्गत हे काम पूर्ण केले असून त्यांना संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
पंढरपूरमध्ये आषाढी वारीचा मुख्य सोहळा, काíतकी एकादशी, चत्री आणि माघी एकादशीनिमित्त वारीच्या काळात येणाऱ्या भाविकांच्या वास्तव्यासाठी ज्या वास्तू अनेक वर्षांपासून उभ्या आहेत, त्यांना ‘मठ’ अशी संज्ञा आहे. तसेच या भौतिक रचनेपलीकडे जाऊन, तत्त्वज्ञानाच्या आणि धार्मिक अंगाने विशिष्ट धर्माचरण करणाऱ्या वारकऱ्यांच्या समूहाला ‘फड’ असे म्हटले जाते. पंढरपूरमध्ये असे अनेक मठ आणि फड अस्तित्वात आहेत. त्यांना संस्था आणि संघटनात्मक स्वरूप प्राप्त झाल्याने त्यांचे मठाधिपती आणि फडकरीही आहेत. सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्टय़ा मठ, फड आणि दिंडय़ा यांचे महत्त्व आहे. त्यामुळे मठ-फडांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायला हवा, ही कल्पना सर्वप्रथम ज्येष्ठ संशोधक डॉ. रा. ग. हष्रे यांना सुचली होती. तसा प्रकल्पही त्यांनी हाती घेतला होता. पण, त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला नाही. डॉ. हष्रे यांनी सुरू केलेल्या कामाचे तपशील वा. ल. मंजूळ यांना उपलब्ध झाले आणि त्यात मोलाची भर घालून त्यांनी पंढरपूरमधील मठ-फडांचा-दिंडय़ांचा इतिहास प्रथमच शब्दबद्ध केला आहे.
या संदर्भात माहिती देताना मंजूळ म्हणाले, ‘पंढरपुरातील मठांचा आणि फडांचा इतिहास’ असा संशोधनात्मक प्रकल्प तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर सोशल सायन्सेस’मार्फत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (यूजीसी)कडे २००५ मध्ये सादर केला होता. तीन वष्रे पाठपुरावा करून हा प्रकल्प आता सिद्ध झाला आहे. मात्र, दरम्यानच्या काळात मी हस्तलिखित संकलनाच्या कार्यात गुंतल्याने ग्रंथरूपातील लेखनास विलंब झाला. आता हा इतिहास प्रथमच ग्रंथरूप घेत असल्याचे समाधान वाटते.
ग्रंथात काय आहे ?
- पंढरपूरमधील ४० प्रमुख मठांचा इतिहास
- साडेतीनशे दिंडय़ांचा इतिहास
- ६० फडांची माहिती
- मठ, फड, दिंडी यांच्या व्याख्या आणि महत्त्वाच्या नोंदी
- मूळ अभ्यासक डॉ. हष्रे यांचे मनोगत
- संशोधनाची मीमांसा