लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : गायक आपले अस्तित्व जेव्हा कलेच्या क्षेत्रात विसर्जित करतो तेव्हा त्याची अभिवृत्ती जन्म घेत असते. गाणं हेच लता दीदीचं जगणं होतं. आजही ती गाण्याच्या रुपात जीवंत आहे. दीदी आपल्यातून गेलेली नाही. ती इथेच आहे. दीदीचे अस्तित्व इथे आहे. ते आपल्या भोवतीच आहे. जिथे गाणे असते तिथे दीदी असतेच असते,’ अशी भावना ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी गुरुवारी व्यक्त केली.
लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशन आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्यातर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात येणारा पहिला ‘भारतरत्न लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ राहूल देशपांडे यांना देण्यात आला. त्यावेळी पं. हृदयनाथ मंगेशकर बोलत होते. या कार्यक्रमाला उषाताई मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, एमआयटीचे संस्थापक विश्वनाथ कराड, दीनानाथ रुग्णालयाचे विश्वस्त आणि वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी उपस्थित होते.
या वेळी पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी लता दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. ‘लता दीदी आपल्यातून गेलेली नाही. ती सदैव आपल्या सोबतच आहे. त्यामुळे तिच्या फोटोला हार घालायचा नाही. तिचे पुण्यस्मरण करायचे नाही, ती आपल्यात जिवंत आहे. उषाताई, आशाताई यांच्यासोबत सगळ्यांची हीच भावना होती. त्यामुळे दीदीच्या स्मृतिनिमित्त दोन वर्षात कोणता कार्यक्रम आयोजित केला नाही. मात्र, दीदीचा कार्याला पुढे नेण्यासाठी लोकसेवेत समर्पित असलेल्या लोकांना दीदीच्याच स्मृतीनिमित्त पुरस्कार देण्याचे ठरवले आहे,’ असेही पं. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले.
कलाकाराने नाविन्याचा अट्टाहास धरायला हवा
‘कलाकाराने चूक करायला न घाबरता कामा नये. चूक करा. चूक सुधारा आणि नव्याने चुका करायला सज्ज व्हा. चुकांसोबत शिकण्याचा हा प्रवास आहे. तो तुम्हाला खूप काही शिकवून जातो. पूर्णत्व मिळाले की देवात आणि आपल्यात काही अंतर राहत नाही, म्हणून अपूर्ण राहून उत्तमतेकडे जाण्याचा ध्यास धरायला हवा. सतत नवीन शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. प्रत्येक वेळी गाण्यात नवीन काही तरी शोधण्यासाठी गातो तेव्हा स्वतःला कड्यावरून ढकलून देतो. चौकटी बाहेर जाऊन शब्द आणि चालींशी गप्पा मारत त्यातील नवे काहीतरी शोधता येते. कलाकाराने नेहमीच नाविन्याचा अट्टाहास धरायला हवा,’ असे मत प्रसिध्द गायक राहूल देशपांडे यांनी व्यक्त केले.
भारतरत्न लता मंगेशकर संगीत सेवा हा पुरस्कार स्वीकारताना मंगेशकर कुटुंबाविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशपांडे म्हणाले,‘माझ्या आजोबांना म्हणजेच वसंतराव देशपांडे यांना मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी चार गाणी शिकवली. मास्तरांच्या ऋण आजोबांनी आयुष्यभर मानले. त्यांचा नातू म्हणून मंगेशकर कुटुंबाविषयी मीही कृतज्ञ आहे.’