राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी मी दावेदार नाही; पण निवडणुकांनंतर राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे आणि राज्यात महिला मुख्यमंत्री झालेली मला आवडेल, असे सांगत भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा मुंडे पालवे यांनी महिला सबल असल्यामुळे त्या नेतृत्व करू शकतात, असा विश्वास गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पक्ष नेतृत्वाने आदेश दिल्यास ही जबाबदारी समर्थपणे पार पाडीन, असेही त्या म्हणाल्या.
भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सुरू करण्यात आलेल्या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. आमदार गिरीश बापट, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, प्रदेश चिटणीस योगेश गोगावले, प्रा. मेधा कुलकर्णी, उज्ज्वल केसकर, मुरलीधर मोहोळ, संदीप खर्डेकर, मुक्ता टिळक यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा शुक्रवार (१२ सप्टेंबर) पासून चाळीसगाव येथून सुरू होत असून पक्षाचे नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे या वेळी उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी व्यक्तीच्या विरोधात नाही, तर नेहमीच सत्तेतील प्रवृत्तीच्या विरोधात संघर्ष केला. त्यांच्या शिकवणुकीप्रमाणेच माझेही राजकारण सुरू आहे, असे सांगून पंकजा मुंडे म्हणाल्या, की राज्यात गेल्या पंधरा वर्षांत कोणतेही निर्णय घेतले गेले नाहीत आणि आता गेल्या पंधरा दिवसांत झटपट निर्णय घेतले जात आहेत. हे कशासाठी सुरू आहे हे ओळखण्याइतपत जनता शहाणी आहे.
चोवीस हजार एकर जमिनींचे निवासीकरण
राज्य शासन विकासात नव्हे, तर घोटाळ्यांमध्ये अडकले आहे. या शासनाची गेली पंधरा वर्षे घोटाळ्यांचीच मालिका सुरू आहे. राज्य शासनाने पुणे विभागातील तब्बल २४ हजार ५०० हेक्टर जमिनीचे निवासीकरण करण्याचा घाट घातला असून ही प्रक्रिया नियम डावलून केली जात असल्याचा आरोप पंकजा मुंडे पालवे यांनी पत्रकार परिषदेत केला. या निवासीकरणासाठी बारामती बिल्डर्स असोसिएशनने पत्र दिले होते, असेही त्या म्हणाल्या. निवासीकरणासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांची जमीन बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न पैसा व शक्ती वापरून केला जात आहे. या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित अधिसूचना तातडीने रद्द करावी, असे पत्र नगर नियोजन विभागाला दिले असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील शेतीचे क्षेत्र कमी होत असून शेतजमीन एनए करून ती बिल्डरांना देण्याचा डाव राज्य शासनाकडून सुरू आहे. बिल्डरांचे उखळ पांढरे करण्याचे हे कोणते धोरण आहे, असाही प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.
संग्रहित लेख, दिनांक 12th Sep 2014 रोजी प्रकाशित
राज्यात महिला मुख्यमंत्री झालेली आवडेल – पंकजा मुंडे
राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी मी दावेदार नाही; पण निवडणुकांनंतर राज्यात महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे आणि राज्यात महिला मुख्यमंत्री झालेली मला आवडेल.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 12-09-2014 at 02:50 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde bjp chief minister