राज्यातील आघाडी सरकारने गेल्या १५ वर्षांत काय दिवे लावले, महाराष्ट्राला कर्जबाजारी केलेले हे सरकार सामान्यांचे नसून प्रस्थापितांचे आहे, ते उलथवून टाका, अशी टीका भाजप नेत्या व आमदार पंकजा मुंडे यांनी पिंपरीत केली. गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीच विसरू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करतानाच आम्ही जिल्ह्य़ाचे नव्हे तर राज्याचे नेतृत्व करतो, अशी सूचक टिपणी त्यांनी केली.
पुन्हा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने पंकजा मुंडे शनिवारी रात्री पिंपरीत दाखल झाल्या. डॉ. आंबेडकर चौकात स्वागताच्या निमित्ताने शहर भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी झालेल्या सभेत पंकजा मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आघाडी सरकारच्या निष्क्रियतेवर कडाडून हल्ला चढवला. प्रभारी राजीव प्रताप रुडी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बाळा भेगडे, माधुरी मिसाळ, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, अमर साबळे आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
पंकजा म्हणाल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, लोडशेडिंग, महिलांवरील अत्याचार, कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलेली पाहता राज्यात सामान्यांना वाली राहिलेला नाही, असे प्रस्थापितांचे सरकार उलथवून टाका. पैशाची मस्ती आणि ‘मसल पॉवर’ च्या जीवावर निवडणुकाजिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवा. अनुकंपा तत्त्वावर आपल्याला मुंडे यांचे उत्तराधिकारी व्हायचे नव्हते तर गुणवत्तेवर व्हायचे आहे. मुख्यमंत्री होण्याचे वा लाल दिव्याची गाडी हे मुंडे यांचे स्वप्न नव्हते. सामान्य माणसाला सत्तेत सामावून घेणे, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, महिलांना सन्मान मिळवून देणे हे त्यांचे स्वप्न होते. या वेळी रुडी, सदाशिव खाडे, अमर साबळे आदींची भाषणे झाली.