‘मतदार राजा’ पाठिशी असूनही गटबाजीच्या राजकारणामुळे दयनीय अवस्था झालेल्या पिंपरी भाजपमधील मरगळ दूर करण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा व आमदार पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात मुंडे रविवारी एकदिवसीय दौऱ्यावर येत असून या निमित्ताने बीड वासियांचा मेळावा, पदाधिकाऱ्यांशी संवाद, रॅली, युवक मेळावा आदी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवारी अजित पवार पिंपरीच्या दौऱ्यावर आहेत. त्याच दिवशी पंकजा मुंडे याही शहरात आहेत. दुपारी दोन वाजता भोसरीतील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब गव्हाणे यांच्या लांडेवाडीतील संपर्क कार्यालयाचे त्या उद्घाटन करणार आहेत. त्यानंतर, आकुर्डीतील कुंदन हॉटेल येथे बीडवासियांचा मेळावा होणार आहे. त्यानंतर, आकुर्डी, निगडी, रूपीनगर, तळवडे या मार्गावरून रॅली काढण्यात येणार असून जागोजागी त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता तळवडे येथील वंदे मातरम चौकात मोरेश्वर शेडगे यांच्या पुढाकाराने भव्य युवक मेळाव्याचे आयोजन केले आहे. आमदार बाळा भेगडे, शहराध्यक्ष सदाशिव खाडे, अमर साबळे, पश्चिम महाराष्ट्राचे संघटक एकनाथ पवार आदी उपस्थित राहणार आहेत. 

Story img Loader