‘महिलांनी श्रद्धेने मंदिरात जावे, हक्काने नाही. शनिशिंगणापूर येथील मंदिरात हट्टाने जाणाऱ्या महिलांनी समाजातील शांतता भंग करू नये,’ असे वक्तव्य महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना केले.
सावता परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या त्रवार्षिक अधिवेशनावेळी मुंडे बोलत होत्या. शनिशिंगणापूर येथे शनिचौथऱ्यावर जाण्यावरून उद्भवलेल्या वादाबाबत मुंडे यांना विचारले असता ‘मंदिरात दर्शन घेणे हा श्रद्धेचा भाग आहे. मंदिरात हट्टाने प्रवेश मिळवताना महिलांनी सामाजिक शांतता भंग करू नये. आतापर्यंत जातीभेदाची लढाई लढलो आता ही स्त्री-पुरुष भेदाची लढाई कशासाठी, असे मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी त्या म्हणाल्या, ‘लोक मला पुरोगामी म्हणतात. पण ‘जात’ ही गोष्ट कधीच जात नाही. माझा जातींच्या भिंतींवर विश्वास नाही. मात्र जातींच्या गुणांवर आहे.’ यावेळी ‘जलसिंचनासाठी सात हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला. मात्र एकही धरण झाले नाही. या भ्रष्टाचारातून काही लोकांची घरे मात्र भरली,’ असा आरोपही मुंडे यांनी केला.
या वेळी अरण येथील सावतामाळी यांच्या मंदिरासाठी १ कोटी रुपयांचा निधी मुंडे यांनी जाहीर केला. या वेळी आमदार योगेश टिळेकर, अतुल सावे, दत्तात्रय भरणे, मनीषा चौधरी, परिषदेचे संस्थापक कल्याण अखाडे, मेश वसेकर, महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले आदी उपस्थित होते.
विद्यापीठात सावित्रीबाईंचे स्मारक
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येत्या काळात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात येईल. त्याचप्रमाणे मुलींचे वसतिगृह आणि ग्रंथालयही उभारण्यात येणार आहे. त्यासाठी साधारण १३ कोटी रुपयांचा निधी जवळपास मंजूर झाला आहे,’ आमदार योगेश टिळेकर यांनी या वेळी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा