लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : चिंचवडचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा उत्तराधिकारी मीच असल्याचे सांगत त्यांच्या पत्नी विद्यमान आमदार अश्विनी आणि बंधू, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप दोघांनीही आगामी विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता असताना भाजप नेत्या, विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मोठे विधान केले आहे.
भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी मंगळवारी रहाटणीत पदाधिकऱ्यांची बैठक घेतली. चिंचवडमधून निवडणूक लढविण्याबाबत विद्यमान आमदार अश्विनी आणि त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह काही माजी नगरसेवक इच्छुक असून त्यातून मार्ग कसा काढणार असे विचारले असता मुंडे म्हणाल्या, की विधानसभा मतदार संघानिहाय दौरे सुरू आहेत. या बैठकीत १५० पदाधिका-यांची उपस्थिती अपेक्षित असून त्यांच्याशी संभाषण केले जात आहे. संघटनात्मक विषयावर चर्चा केली जाते. विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी सुरू आहे. चिंचवडमधून निवडणूक लढविण्यासाठी पक्षात इच्छूकांची संख्या मोठी आहे. इच्छूकांच्या यादीतून एक उमेदवार द्यावा लागतो. त्याचा चांगला अनुभव पक्षाच्या कोअर कमिटीला आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला जाईल.
आणखी वाचा-सोलापूर रस्त्यावर डंपरची मोटारीला धडक; पिता-पुत्राचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तिघे गंभीर जखमी
मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. कधी-कधी समाजात अशा घटना घडतात. त्या घटना का घडल्या याच्यावर राजकारण करणा-यांनी राजकारण करावे. पण, पंतप्रधान मोदी यांनी या माफी मागितली आहे. त्यांच्या माफीनंतर पूर्ण विराम मिळतो. दुर्देवी घटना असून त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमच्या ह्रदयात आहेत. त्यांचा पुतळा पडल्याच्या वेदना सर्वांनाच झाल्या आहेत. कोणत्याही नेत्यांनी काहीही विधान केले तर त्यावर मी टिप्पणी करणार नाही, असे सांगत अधिक भाष्य करण्यास मुंडे यांनी नकार दिला.
दरम्यान, राज्यातील सर्वात मोठी मतदारसंख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची २००९ मध्ये निर्मिती झाली. तेव्हापासून जगताप कुटुंबाचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिले. एकदा अपक्ष आणि दोनवेळा भाजपच्या चिन्हावर असे तीनवेळा लक्ष्मण जगताप निवडून आले होते. २०१९ मध्ये राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पाठिंब्यावर अपक्ष लढलेल्या राहुल कलाटे यांनी कडवी झुंज दिली. दुरंगी लढतीत जगतापांचा निसटता विजय झाला. कलाटे यांना एक लाख १२ हजार मते मिळाली.
आणखी वाचा-दोषमुक्त करून प्रकरण निकाली काढावे; नाट्यनिर्मात्याची फसवणूक प्रकरण, जरांगेंच्या वकिलांचा युक्तिवाद
जानेवारी २०२३ मध्ये जगतापांचे अकाली निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या पत्नी अश्विनी आणि बंधू शंकर हे दोघे तीव्र इच्छुक होते. उमेदवारीवरून सुप्त संघर्ष झाला. परंतु, भाजप नेतृत्वाने अश्विनी यांना उमेदवारी दिली. कलाटे यांनी बंडखोरी केल्याने तिरंगी लढत झाली आणि जगताप या ३६ हजाराने विजयी झाल्या. महाविकास आघाडीतील बंडखोरी आणि सहानुभूती जगताप यांच्या पथ्यावर पडली होती. आता आगामी निवडणुकीसाठी आमदार अश्विनी आणि त्यांचे दीर शंकर जगताप हे दोघेही उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे त्यातून कसा मार्ग काढला जातो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.