सर्वासाठी पाणी, टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ मोहिमेतील जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती ग्रामविकास, जलसंधारण व रोजगार हमी योजना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
जलयुक्त शिवार अभियानातील पुणे विभागाची कार्यशाळा रविवारी यशदा येथे झाली. कार्यशाळेचे उद्घाटन जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तसेच अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी मुंडे बोलत होत्या. जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, जलसंपदा विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, कृषी आयुक्त उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त विकास देशमुख आदी त्या वेळी उपस्थित होते.
मुंडे म्हणाल्या, वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे. योजनेमध्ये लोकांचा सहभाग आवश्यक आहे. लोकसहभागाशिवाय ही योजना यशस्वी होणार नाही. मोठी धरणे उभी करण्याच्या तुलनेत या योजनेतून होणाऱ्या कामांचे फायदे लवकर मिळू शकतात. पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविण्याचा या योजनेचा प्रयत्न आहे.
बापट म्हणाले, पुणे जिल्ह्य़ात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी त्याची जबाबदारी घेऊ. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लोकसहभागातून निधी उभारू. या योजनेतून निसर्गावर मात नव्हे, तर निसर्गाशी मैत्री केली पाहिजे. हा संदेश लोकांना पटवून द्यायला हवा.
शिवतारे म्हणाले, या योजनेमुळे अनेक गावे टंचाईमुक्त होतील. त्यामुळे पर्यावरणाची हानी टळेल. जलसंपदा विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.