फुकट सिगारेट न दिल्याने पानपट्टी चालकावर तलवारीने वार करण्यात आल्याची घटना कोंढवा भागातील टिळेकरनगर परिसरात घडली. या प्रकरणी सराइतांना अटक करण्यात आली. साहिल रोहन आडके (वय १८ ) आणि ॲलेस्टर अॅन्थोनी भोसले (वय २०) अशी अटक केलेल्या सराईतांची नावे आहेत. याबाबत अजय मनोजकुमार मिश्रा (वय २२, रा. लक्ष्मीनगर ) याने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा- पुणे : शहरातील तीन हजार ७६५ गुन्हेगारांची झाडाझडती, पिस्तुलासह १४५ कोयते जप्त
मिश्रा याची टिळेकरनगर परिसरात पानपट्टी आहे. आरोपी साहिल आणि ॲलेस्टर पानपट्टी सिगारेट खरेदीसाठी आले. मिश्राने त्यांना पैसे मागितले. तेव्हा दोघांनी मिश्रा याच्यावर तलवारीने वार केले. मिश्राने वार हुकवला. आम्हाला ओळखत नाही का. आम्ही एक खून केला आहे. दररोज फुकट सिगारेट द्यायची, अशी धमकी देऊन दोघांनी तलवार उगारुन दहशत माजविली. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघा आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप बिराजदार तपास करत आहेत.