कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या दिवशी एका लहान मुलाने आरोपी समीर गायकवाडला घटनास्थळावर पाहिले होते, असा दावा या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाकडून ( एसआयटी) करण्यात आला आहे. एसआयटीने सोमवारी न्यायालयात सादर केलेल्या याबाबतचा उल्लेख केला आहे. आरोपपत्रात नमूद केल्याप्रमाणे पानसरे यांची हत्या झाली त्या दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारी रोजी एका १४ वर्षीय मुलाने समीर गायकवाडला घटनास्थळावर पाहिले होते. पोलिसांनी या लहान मुलाची ओळख गुप्त ठेवली असून त्याने ओळख परेडच्यावेळी समीर गायकवाडला ओळखल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे. मात्र, पोलीस पूर्णपणे या मुलाच्या साक्षीवर अवलंबून नाहीत. दरम्यान, या दोषारोपपत्रात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष साक्षींची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने समीरने त्याची प्रेयसी ज्योती कांबळे हिच्याशी १९ जून आणि २० जून रोजी जे संभाषण केले त्याचप्रमाणे त्याची बहीण अंजली झरकर हिच्याशी २१ जून तर त्याचा मित्र सुमीत खामणकर याच्याशी २७ जून २०१५ रोजी झालेल्या या सर्व संभाषणामध्ये कॉ. पानसरे यांच्या खुनाचे संदर्भ मिळत असल्याने हा सक्षम पुरावा दोषारोपपत्रात नमूद करण्यात आला आहे.
समीर गायकवाड याच्या विरोधात सोमवारी पोलिसांनी खून करणे, खुनाचा कट रचणे यासह पाच प्रमुख आरोप असलेले दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. ३७२ पानांचे हे दोषारोपपत्र आहे. १८ डिसेंबर रोजी या प्रकरणी सुनावणी होणार असून समीरला हजर राहण्याबाबत समन्स पाठविण्यात येणार आहे. समीरचे भ्रमणध्वनीवरील संभाषण, ७७ साक्षीदारांच्या साक्षी अशा महत्त्वाच्या नोंदी दोषारोपपत्रात आहे.

Story img Loader