सरकारने एक ते तीन रुपये किलो दराने धान्य उपलब्ध करून दिले असले, तरी ते गरीब कुटुंबांना ते मिळत नाही हे पाहून मला आश्चर्य वाटते. त्यासाठी तुम्हाला आधी तुमच्याकडे पिवळे आणि केशरी रेशनकार्ड मिळाले पाहिजे. तुमच्या मागण्या योग्य आहेत; पण आता आचारसंहिता संपेपर्यंत ठोस निर्णय सरकार घेऊ शकणार नाही. त्यानंतर मात्र सरकार गांभीर्याने प्रयत्न करेल, असे आश्वासन वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शनिवारी घरेलू काम करणाऱ्या महिलांना दिले.
जागतिक महिलादिनानिमित्त शहर काँग्रेसतर्फे घरेलू कामगारांचा मेळावा काँग्रेस भवनाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. अखिल भारतीय काँग्रेसचे चिटणीस शौराज वाल्मीकी आणि खासदार रजनी पाटील यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. शहराध्यक्ष अभय छाजेड, आमदार रमेश बागवे, विनायक निम्हण, तसेच उल्हास पवार, चंद्रकांत छाजेड, रोहित टिळक, राज्य घरेलू कामगार संघाचे चिटणीस सुनील शिंदे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
घरकाम करणाऱ्या शेकडो महिला मेळाव्याला उपस्थित होत्या. सरकार तीन रुपये किलो दराने तांदूळ, दोन रुपये किलो दराने गहू देते ते धान्य तुम्हाला मिळते का, असा प्रश्न या वेळी पतंगराव कदम यांनी महिलांना विचारल्यावर महिलांनी हात उंच करून जोरदार नकार देत ‘नाही, नाही’ असे सांगितले. त्यानंतर पतंगराव म्हणाले, की तुम्हाला धान्य मिळत नाही हे पाहून मला आश्चर्य वाटले; पण तुम्हाला स्वस्त धान्य मिळवण्यासाठी आधी पिवळे आणि केशरी कार्ड मिळवावे लागेल. तुम्ही केलेल्या मागण्या योग्य आहेत. परंतु आचारसंहिता संपेपर्यंत ठोस निर्णय सरकार घेऊ शकणार नाही. मात्र, आचारसंहिता संपल्यानंतर तुमच्या मागण्यांबाबत सरकार गांभीर्याने विचार करेल. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड तुम्हाला मिळालेच पाहिजे. त्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीन.
पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अन्नसुरक्षा विधेयकासह ज्या अनेक योजना आणल्या आहेत, त्यामुळे जनतेला निश्चित चांगला लाभ होणार असल्याचे शौराज वाल्मीकी यांनी सांगितले. कार्यक्रमात शुभदा आरोळे, गुरुबन्स कौर, डॉ. वैजयंती पटवर्धन, माधवी धाराशिवकर, वासंती बेडेकर आणि सविता जोशी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. अभय छाजेड यांनी प्रास्ताविक आणि नीता परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा