जनसुनावणीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्याची लवकरच नेमणूक
पनवेल शहर महानगरपालिका निर्मिती प्रक्रियेला येत्या आठ दिवसांत सुरुवात होईल. यासाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे राज्याच्या नगरविकास विभागातील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. रायगड जिल्हाधिकाऱ्यांसमोर महानगरपालिकेसंदर्भात हरकती नोंदविल्यानंतर जनसुनावणी होणे अपेक्षित होते; परंतु येत्या आठ दिवसांत कार्यवाही सुरू होईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर जनसुनावणीचा कार्यक्रम होईल.
पनवेल नगर परिषद हद्दीतील शहर आणि वसाहती, सिडको क्षेत्रातील २१ गावे, नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित (नैना) क्षेत्रातील ३६ गावे, मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) क्षेत्रातील ११ गावांचा समावेश केला जाईल. शहर आणि ६८ गावे एकत्रित करून त्यात पाच लाख ९५ हजार लोकसंख्या गृहीत धरलेली आहे. सुमारे १८ हजार हेक्टर जमिनीवरील क्षेत्र महानगरपालिकेत विलीन करण्याविषयीची प्राथमिक अधिसूचना सरकारने काढली होती. त्यानंतर खारघरमधील रहिवाशांनी नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करण्याची मागणी केली होती.
करंजाडे, पुष्पकनगर, प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित गावांना या पनवेल महानगरपालिकेतून अभ्यास समितीने वगळल्याने या गावांचाही समावेश करावा, अशा सूचना ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. काही राजकीय पक्षांनी सरकारच्या या दुटप्पीपणावर टीका केली होती. त्यातच निवडणूक आयोगाने जुन्या पनवेल नगर परिषदेचा निवडणूक कार्यक्रम हाती घेतला आहे.

वीज, पाण्याबाबत पनवेलला स्वयंपूर्णता हवी
तत्कालीन कोकण विभागीय आयुक्त तानाजी सत्रे यांच्या समितीने महानगरपालिकेच्या अहवालात वीज विषयाला फाटा दिला आहे. शहरात वारंवार वीज खंडित होत असल्याने सर्वच स्तरांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पनवेल महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी विजेबाबत पनवेलला स्वयंपूर्णता हवी, असा आग्रह नागरिकांनी धरला आहे. पाण्याची स्थिती सुधारण्यासाठी धरणांची तजवीज आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

महानगरपालिकेची प्रक्रिया थांबवण्यात आलेली नाही. येत्या आठवडय़ाभरात कोकण विभागीय आयुक्त दर्जाचा अधिकारी महानगरपालिकेसाठी प्राधिकृत केला जाईल. त्यानंतर प्राधिकृत अधिकारी महापालिकेची जनसुनावणीची कार्यवाही पार पाडतील.
-सुधाकर शिंदे, उपसचिव नगरविकास विभाग

Story img Loader