वेगवेगळ्या कारणांमुळे रेल्वे खोळंबल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील, कधी तांत्रिक अडचणींमुळे तर कधी पावसामुळे रेल्वे खोळंबल्याचं आपण पाहिलं आहे. चक्क झुरळांमुळे रेल्वे तब्बल दोन तास खोळंबल्याची घटना नुकतीच पुण्यात पाहायला मिळाली आहे. झुरळांमुळे पनवेल-नांदेड एक्सप्रेस पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी तब्बल दोन तास थांबवली होती. या रेल्वेत इतकी झुरळं होती की प्रवास करणं प्रवाशांसाठी अशक्य झालं होतं. अखेर ही रेल्वे प्रवाशांनी पुणे स्थानकावर थांबवली. पेस्ट कंट्रोल केल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही अशी कठोर भूमिका प्रवाशांनी घेतली. शेवटी रेल्वे प्रशासनाने पेस्ट कंट्रोल केल्यानंतरच प्रवाशांनी रोखून धरलेली पनवेल-नांदेड एक्सप्रेस पुढे सोडण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या एक्सप्रेसमधील प्रवाशांनी गाडी थांबवली. त्याचबरोबर या घटनेचा व्हिडीदेखील व्हायरल केला. या रेल्वेने प्रवस करणारे एक प्रवासी कैलास मंडलापुरे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत त्यांनी म्हटलं आहे की, आम्ही पनवेल-नांदेड रेल्वे क्रमांक १७६१३ ने प्रवास करत आहोत. मी या रेल्वेच्या बी १ या एसी कोचमधून प्रवास करतोय. प्रवासादरम्यान, प्रवाशांच्या अंगावर झुरळं पडत आहेत. या ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात झुरळं आहेत. ही झुरळांनी भरलेलेली ट्रेन आहे.

प्रवासी मंडलापुरे यांनी सांगितलं की, या ट्रेनमध्ये महिला, वृद्ध, लहान मुलं, नवजात बाळंसुद्धा आहेत. सर्वांना या झुरळांनी हैराण केलं आहे. आम्ही रेल्वे प्रशासनाकडे याबद्दल तक्रार करूनही रेल्वे प्रशासन कुठलीही कारवाई करायला तयार नाही. सव्वा तासापासून ही रेल्वे पुणे स्थानकावर उभी आहे.

हे ही वाचा >> “आमदार रत्नाकर गुट्टे मेले तरी…”, महादेव जानकरांचं मोठं वक्तव्य

दरम्यान, प्रवाशांनी आपली मागणी लावून धरल्यानंतर अखेर या रेल्वेत पेस्ट कंट्रोल करण्यात आलं. त्यानंतर दोन तासांनी ही ट्रेन नांदेडकडे रवाना करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panvel nanded express halted at pune due to many cockroaches spotted in ac coach asc
Show comments