भारतीय संस्कृती आणि समाजाच्या शास्त्रीयदृष्टय़ा संशोधनात्मक १२ हजार वर्षांच्या इतिहासाचे समांतर लेखन करण्याचा संकल्प ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी केला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासकांच्या समितीकडून इतिहासाचे एकांगी दर्शन घडण्याची शक्यता असल्याने हा इतिहासावरच अन्याय होईल, अशी भूमिका डॉ. देवी यांनी मांडली.

हिमयुगानंतरच्या काळातील देशाचा १२ हजार वर्षांचा इतिहास नव्याने लिहिण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समितीतील सर्व सदस्य हे उत्तर भारतातील आहेत. त्यामुळे केवळ आर्यन संस्कृतीचा इतिहास पुढे यावा हा त्यामागचा उद्देश असावा की काय अशी शंका निर्माण होऊ शकते. दक्षिण भारतातील एकाही अभ्यासकाला या समितीमध्ये जाणीवपूर्वक घेण्यात आलेले नाही. उत्तर भारतामध्ये आर्यन आणि संस्कृत, तर दक्षिण भारतामध्ये द्राविडी संस्कृतीचा मोठा इतिहास आहे. पण, या समितीमध्ये दक्षिण भारतीय अभ्यासक नसल्याने या नव्या इतिहासामध्ये द्राविडी संस्कृतीचा समावेश नसेल. त्यामुळे इतिहासाचे विडंबन होण्याची शक्यता आहे, याकडे डॉ. देवी यांनी लक्ष वेधले.

इतिहास नव्याने लिहिण्यास हरकत असण्याचे कारण नाही. पण, हा इतिहास शास्त्रीयदृष्टय़ा परिपूर्ण आणि वस्तुनिष्ठ असला पाहिजे. केंद्र सरकारच्या समितीद्वारे केले जाणारे इतिहास लेखन एकतर्फी होण्याची शक्यता आहे. हे टाळून भारतीय संस्कृती आणि समाजव्यवस्थेचे समग्र दर्शन घडविण्याच्या उद्देशातून सरकारी इतिहासाला समातंर इतिहास लिहिला जाणार आहे, असे देवी यांनी सांगितले.

समांतर इतिहास मनुष्यकेंद्री

समांतर इतिहास लेखन राजेरजवाडेकेंद्री नव्हे, तर मनुष्यकेंद्री असेल, असे डॉ. गणेश देवी यांनी स्पष्ट केले. इतिहासासंदर्भात विद्यार्थी आणि शिक्षकांनाही सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीपासूनचा सम्राट अशोक, गौतम बुद्ध यांचा कालखंड ठाऊक असतो. त्यापूर्वीचा वेदकाळ हा धूसरपणे माहीत असतो. रामायण-महाभारत वेदांआधी होते की नाही याविषयी मतमतांतरे आहेत. हे दोन्ही ग्रंथ हा इतिहास आहे की काव्य की या दोन्हीचे मिश्रण याविषयी वादविवाद आहेत. मात्र, प्राचीन भारतामध्ये तत्त्वज्ञानविषयक घडामोडी चालायच्या हे निश्चितपणे सांगता येते. पृथ्वीची निर्मिती कशी झाली याविषयी शास्त्रज्ञांना निश्चित माहिती आहे. आपण आपल्या इतिहासाचा नीट क्रम लावू शकलो नाही. त्यामध्ये मिथके मोठय़ा प्रमाणावर आहेत, याकडे देवी यांनी लक्ष वेधले.

उत्खननामधून सापडलेल्या विटा, दगडांची हत्यारे या माध्यमातून पुरातत्त्व तज्ज्ञांना इतिहास बऱ्यापैकी माहीत आहे. पण, त्यांची तांत्रिक भाषा अवघड असल्याने तो इतिहास समाजापर्यंत पाझरला नाही. सर्वसामान्यांना समजेल अशा रीतीने हा इतिहास पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. इतिहासातील धूसर जागांमुळे होणारा अपप्रचार दूर करण्याचे काम होईल. केंद्र सरकारच्या इतिहास लेखनापूर्वी म्हणजे पुढील वर्षीच्या मेपर्यंत समांतर इतिहास लेखनाचे काही खंड प्रकाशित व्हावेत यादृष्टीने काम सुरू झाले आहे, असे डॉ. देवी यांनी सांगितले.