शारीरिक शिक्षण, क्रीडा हे शालेय अभ्यासक्रमांतील नियमित विषय. मात्र ते स्वतंत्र सुविधा दाखवून त्यासाठी वेगळे शुल्क आकारण्याची नवीच शक्कल आता शाळांनी काढली आहे. काही खेळांचे प्रशिक्षण बंधनकारक करून त्यासाठी १० ते १५ हजार शुल्क शाळांकडून आकारण्यात येत आहे.

शारीरिक शिक्षण, क्रीडा, कला हे शालेय अभ्यासक्रमांतील नियमित विषय आहेत. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडय़ात त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्व शाळांना या विषयांचे शिक्षण देणे बंधनकारक आहे. गेल्यावर्षीपासून योगाचाही समावेश अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. कोणत्या खेळांचा अभ्यासक्रमांत समावेश करता येईल, कोणत्या खेळांची ओळख विद्यार्थ्यांना करून देता येईल याची यादीच केंद्रीय शिक्षण मंडळाकडून त्यांच्याशी संलग्न शाळांना देण्यात येते. मात्र असे असतानाही एखाद्या खेळाचे प्रशिक्षण, योग प्रशिक्षण, कलेचे प्रशिक्षण ही अतिरिक्त सुविधा पुरवण्यात येत असल्याचे दाखवून त्यासाठी वेगळे शुल्क उकळण्याचा प्रकार सुरू आहे. शाळेचे नियमित शुल्क, वाहतुकीचे शुल्क हे पालक संघटनेच्या संमतीने ठरवण्यात येते. मात्र त्यानंतर वेगवेगळे उपक्रम, सहली, प्रशिक्षणे दाखवून शुल्क उकळण्याचा प्रकार शाळांनी सुरू केला आहे. कोथरूडमधील, पिंपरी-चिंचवड येथील काही शाळांमध्ये हा प्रकार सुरू आहे.

शाळेकडून खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना बंधनकारक करण्यात येते. हे प्रशिक्षण कागदोपत्री बंधनकारक असल्याचे दाखवण्यात येत नाही. विद्यार्थ्यांना त्रास होईल या भीतीने पालकांना हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. कोथरूड येथील एका नामांकित शाळेने खेळासाठी १५ हजार रुपये शुल्क आकारले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना एक खेळ आणि दोन कला यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती पालकांनी दिली.

‘शाळेत प्रवेश घेताना खेळ किंवा कला यांसाठी वेगळे शुल्क द्यावे लागेल याची कल्पना पालकांना देण्यात आली नाही. पालक शिक्षक संघाने शैक्षणिक शुल्क मंजूर केले. मात्र त्यानंतर आता वेगवेगळ्या मार्गाने शाळा पैसे मागत आहे. याबाबत पालकांची बैठक घेण्यात यावी अशी मागणी शाळेकडे करण्यात आली आहे. मात्र शाळा टाळाटाळ करत आहे,’ असे पालकांनी सांगितले.

Story img Loader