लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देणे आता पालकांना महागात पडणार आहे. अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना २५ हजार रूपये दंड केला जाणार आहे. याचबरोबर अशा अल्पवयीन मुलांना २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत वाहन चालविण्याचा परवानाही मिळणार नाही. याबाबतचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भीमनवर यांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना (आरटीओ) दिले आहेत.

परिवहन आयुक्तांनी सर्व आरटीओंना पाठविलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, १८ वर्षांखालील मुलगा अथवा मुलीस सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविण्यास परवानगी नाही. याला केवळ ५० सीसीपेक्षा कमी इंजिन क्षमतेच्या दुचाकींचा अपवाद आहे. या दुचाकी १६ वर्षांवरील सर्वांना चालविण्यास परवानगी आहे. अल्पवयीन मुलांनी वाहने चालवू नयेत, यासाठी कारवाईच्या सूचना परिवहन विभागाकडून सातत्याने केल्या जात आहेत. त्याचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे यापुढे या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे. सर्व आरटीओंनी अल्पवयीन वाहन चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाईची मोहीम हाती घ्यावी.

आणखी वाचा-निगडीत पलटी झालेल्या टँकरमधील गॅस गळती रोखण्यात १४ तासांनी यश

राज्यातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकूण अपघातांमध्ये दुचाकी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मागील वर्षाचा विचार करता एकूण अपघातांपैकी ५१ टक्के अपघात दुचाकीस्वारांमुळे झाले. यात ७ हजार ७०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. यातच अल्पवयीन मुलांकडून दुचाकी चालविण्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. यामुळे अनेकवेळा गंभीर अपघात घडत आहे. हे अपघात रोखण्यासाठी आता परिवहन विभागाने हे पाऊल उचलले आहे.

मोटार वाहन कायद्यातील तरतूद काय?

मोटार वाहन कायदा (सुधारित) २०१९ नुसार, अल्पवयीन मुलगा अथवा मुलगी गाडी चालविताना आढळल्यास त्यांच्या पालकांना तुरूंगवास होऊ शकतो. हा तुरूंगवास तीन वर्षांपर्यंत आहे. याचबरोबर २५ हजार रूपये दंडाचीही तरतूद आहे. तसेच, त्या अल्पवयीन मुलाला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंच वाहन चालवण्याचा परवाना मिळणार नाही.