पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशांसाठीची ऑनलाइन सोडत सोमवारी (१० फेब्रुवारी) सकाळी अकरा वाजता काढण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम त्याच दिवशी सकाळी अकरा वाजता होणार असल्याने सोडतीची वेळ बदलण्याची वेळ आली आहे. आता आरटीई प्रवेशांची सोडत दुपारी एक वाजता काढण्यात येणार आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यभरातील ८ हजार ८६३ शाळांमधील एक लाख नऊ हजार १११ जागांसाठी तीन लाख पाच हजार ८२८ अर्ज दाखल आहेत. पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) येथे सोडत काढण्यात येणार आहे. ऑनलाइन सोडत जाहीर झाल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसांत पालकांना प्रवेशासाठीचा लघुसंदेश अर्जात नमूद केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकांवर येईल. त्यानंतर शाळा प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम सोमवारी सकाळी अकरा वाजता होणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांना तणावमुक्त मार्गाने परीक्षेला सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन करून संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम विद्यार्थी, शिक्षक, पालकांना पाहता येण्यासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सोडत सकाळी अकराच्या ऐवजी दुपारी एक वाजता काढण्यात येणार आहे.

Story img Loader