पुणे : राज्यातील विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन परिवर्तन आघाडी स्थापन केली आहे. विधानसभेच्या आगामी निवडणुकीत सर्व २८८ जागा लढवण्याचा निर्धार या आघाडीने गुरुवारी पुण्यातील बैठकीत केला. नवीन शासकीय विश्रामगृहात परिवर्तन आघाडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील विविध शेतकरी प्रश्नांसह आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना, तसेच काही पक्षांसोबत परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून लढा उभारण्याचा निर्णय राज्यातील शेतकरी चळवळीतील मुख्य प्रवाहातील शेतकरी संघटनांकडून या वेळी घेण्यात आला. या बैठकीस माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार वामनराव चटप, माजी आमदार शंकर धोंडगे, अनिल घनवट, ललित बहाळ, डॉ. महावीर अक्कोळे, ॲड. योगेश पांडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा >>> महापालिका आयुक्तच डेंग्यूसदृश रोगाने आजारी पडतात तेव्हा…
‘आघाडीच्या वतीने राज्यातील विविध संघटना व छोट्या-मोठ्या पक्षांना सोबत घेऊन २८८ विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या बैठकीत जागावाटप आणि पुढील धोरण ठरविण्यात येणार आहे,’ असे चटप यांनी सांगितले.
हेही वाचा >>> आंतरराष्ट्रीय प्रवास करताय? ‘पल्मनरी एम्बोलिझम’च्या वाढत्या धोक्याबद्दल जाणून घ्या…
‘बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, सातत्याने पडत असलेले शेतमालाचे दर, कर्जाच्या बोजाखाली दबलेला शेतकरी, केंद्र सरकारचे आयात-निर्यात धोरण, राज्याची आर्थिक स्थिती, राज्यात वाढलेला सामाजिक संघर्ष या प्रश्नांवर परिवर्तन आघाडीच्या वतीने लढा उभारण्यात येणार आहे. राज्यातील सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सामाजिक संघटनांसोबत परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून एक सक्षम पर्याय देणार आहोत,’ – राजू शेट्टी</strong>, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अध्यक्ष