पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी विविध संघटनांनी एकत्र येत स्थापन केलेल्या ‘परिवर्तन महाशक्ती आघाडी’चे राज्यातील १५० जागांवर एकमत झाले आहे. परिवर्तन महाशक्तीची वज्रमूठ महायुती आणि महाविकास आघाडीला टक्कर देईल, असा दावाही परिवर्तन महाशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘परिवर्तन महाशक्ती’ची बैठक शिवाजीनगर येथील स्वराज्य भवन येथे झाली. या बैठकीत राज्यातील १५० जागांवर एकमत करण्यात आले. त्याची माहिती बैठकीनंतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी, स्वतंत्र भारत पक्षाचे वामनराव चटप, महाराष्ट्र राज्य समितीचे शंकरअण्णा धोंडगे, भारतीय जवान किसान पक्षाचे नारायण अंकुशे यांच्यासह अन्य समविचारी संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा…विद्यमान आमदारांना ‘हरियाणा पॅटर्न’चा धसका, उमेदवार बदलणार, की राहणार, याबाबत भाजपचे ‘नवे’ निकष

परिवर्तन महाशक्तीमधअये समविचारी तीस ते चाळीस संघटना सहभागी झाल्या आहेत. या सर्वांचे १५० जागांवर एकमत झाले आहे. काही जागा दोन-दोन पक्षांना हव्या आहेत. त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असा दावा यावेळी करण्यात आला.

‘शरद पवार कसे परिवर्तन करणार, तो तर आमचा अधिकार आहे. महाविकास आघाडी आणि महायुती वेगवेगळ्या रंगाची पॅकेज आहेत. मात्र त्यांची कार्यपद्धती एकच आहे,’ अशी टीका यावेळी राजू शेट्टी यांनी केली. तर, ‘आमचे सरकार कोणत्याही एका झेंड्याचे नसेल तर, तिरंग्याचे असेल,’ असे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा…मतदान आळसाची पुणेकरांची सवय जुनीच!

‘राजू शेट्टी आणि बच्चू कडू यांच्याविषयी गैरसमज पसरविण्यात आले. मात्र त्यांची बैठकीतील उपस्थितीमुळे ते परिवर्तन महाशक्तीबरोबरच राहणार असल्याचे स्पष्ट करणारे आहे,’ असे छत्रपती संभाजीराजे यांनी नमूद केले. राज्यात काही मोजकीच घराणी राज्यकर्ते आहेत. त्यांनी कष्टकरी वर्गाला नेहमीच वंचित ठेवले. त्याला उत्तर देण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले आहेत. प्रस्थापितांना बाजूला करणे आणि जनतेचे राज्य आणणे, हा परिवर्तन महाशक्तीचा उद्देश आहे. महाविकास आघाडी किंवा महायुतीमधून कोणी परिवर्तन महाशक्तीमध्ये येत असेल तर त्याची पात्रता, निवडणून येण्याची क्षमतेचा विचार करून त्याचे स्वागत केले जाईल, असा दावा यावेळी करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parivartan mahashakti aghadi formed by various organizations for assembly elections reached consensus on 150 seats pune print news apk 13 sud 02