पुणे : पुणे मेट्रोच्या काही मोजक्या स्थानकांवर सध्या वाहनतळाची सुविधा उपलब्ध आहेत. यातील पुणे जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकावर सशुल्क वाहनतळ सुविधा सोमवारपासून (ता.३०) सुरू झाली. या ठेकेदाराने वाहनचालकांकडून दुप्पट वसुली सुरू केल्याने मेट्रोच्या तिकिटापेक्षा वाहनतळ महाग असल्याची तक्रार प्रवाशांनी सुरू केली. यामुळे अखेर महामेट्रोने पहिल्याच दिवशी या ठेकेदाराचे कंत्राट रद्द केले.

पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महापालिका, संत तुकारामनगर, फुगेवाडी, बोपोडी, शिवाजीनगर, जिल्हा न्यायालय स्थानके, आयडियल कॉलनी आणि मंगळवार पेठ स्थानकावर वाहनतळाची सुविधा आहे. मेट्रोकडून या ठिकाणी सशुल्क वाहनतळाची सुविधा सुरू केली जात आहे. या ठिकाणी दुचाकीसाठी एका तासाला ८ रुपये आणि दोन तासाला १२ असे शुल्क आकारण्यात येते. याचबरोबर हेल्मेट ठेवण्यासाठी ५ रुपये शुल्क आकारण्यात येते. याचे कंत्राट देण्यात आले आहे.

आणखी वाचा-ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मद्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप

जिल्हा न्यायालय स्थानकातील वाहनतळ सुविधा सोमवारपासून सुरू झाली. ठेकेदाराने वाहनचालकांकडून दुप्पट शुल्क वसुली सुरू केली. त्याने दुचाकीसाठी तासाला १५ रुपये शुल्क आणि मोटारीसाठी तासाला ३५ रुपये शुल्क आकारण्यास सुरूवात केली. याबाबतची तक्रार अनेक मेट्रो प्रवाशांनी केली. मेट्रोचा तिकिटाचा किमान दर १० रुपये आहे. याचवेळी वाहनतळ शुल्काचा दर त्यापेक्षा जास्त असल्याचा मुद्दाही प्रवाशांनी उपस्थित केला. वाहनतळ शुल्कावरून आरडाओरडा झाल्यानंतर महामेट्रोने संबंधित ठेकेदाराचे कंत्राट रद्द केले.

आणखी वाचा-Baramati Assembly Election : विधानसभेला बारामतीत काका-पुतण्या भिडणार का? कसं आहे राजकीय समीकरण?

मेट्रोच्या शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय स्थानकात सशुल्क वाहनतळ सुविधा सोमवारपासून सुरू झाली. तेथील ठेकेदार निश्चित शुल्कापेक्षा जास्त वसुली करीत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे आम्ही त्याची वाहनतळ शुल्क वसुली थांबवून त्याचे कंत्राट रद्द केले. -हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

Story img Loader