पिंपरी प्राधिकरणाच्या विविध पेठांमधील वाहनतळांचे आरक्षण विकसित करण्याचा निर्णय प्राधिकरण प्रशासनाने घेतला आहे. वाहनतळांच्या जागा निविदा काढून विकसित केल्या जाणार आहेत. त्यासाठीच्या प्रस्तावाला प्राधिकरण सभेने नुकतीच मंजुरी दिली.
पिंपरी प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक ४ मोशी, पेठ क्रमांक ७ भोसरी, पेठ क्रमांक २० आणि १८ चिखली कृष्णानगर तसेच पेठ क्रमांक २५ निगडी येथील वाहनतळांचे आरक्षण विकसित केले जाणार आहे. वाहनतळांच्या आरक्षणाच्या जागा महापालिकेने विकसित कराव्यात, असा प्रस्ताव प्राधिकरणाने महापालिकेला दिला होता. त्यासाठी जागांच्या बदल्यात प्राधिकरणाने ५३ कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, महापालिकेने इतके पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे अर्धा एकरपासून ते दीड एकपर्यंत क्षेत्रफळ असलेल्या वाहनतळांच्या जागांचा विकास स्वत:च करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला. त्यासाठी प्राधिकरण सभेपुढे प्रस्ताव ठेवून त्याला मंजुरी घेण्यात आली आहे. वाहनतळ विकसित करण्यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पार पडल्यानंतर वाहनतळ विकसित करण्यासाठीचे काम लवकरच सुरू करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न आहे.
शहरामध्ये सध्या वाहनतळाचा प्रश्न भेडसावत आहे. वाहनतळाच्या समस्येवर महापालिका प्रशासन तोडगा काढू शकलेले नाही. मोशी, चिखली, भोसरी या विस्तारणाऱ्या क्षेत्रामध्ये वाहनतळाची समस्या जाणवणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाने वाहनतळाच्या जागांचा विकास केला तर त्याचा फायदा थोडय़ाफार प्रमाणात होऊ शकतो. निविदा काढून खासगी ठेकेदाराकडून वाहनतळ विकसित केल्यास ‘पे अँड पार्क’ या तत्त्वावर त्याचा वापर केला जाणार आहे.
प्राधिकरण हद्दीतील वाहनतळांचे आरक्षण विकसित करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे दिला होता. मात्र, महापालिकेने त्याला नकार दिल्यानंतर प्राधिकरणाने निविदा काढून वाहनतळाच्या जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
– सतीशकुमार खडके, मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी प्राधिकरण