अष्टविनायकांपैकी एक स्थान असलेल्या रांजणगाव महागणपती देवस्थान मंदिर परिसराभोवती व प्रवेशद्वारासमोरील डाव्या व उजव्या बाजूला दोनशे मीटर अंतरापर्यंत वाहने लावण्यास बंदी घालण्याचा निर्णय पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी घेतला आहे. वाहतूक कोंडी टाळण्याबरोबरच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला गेल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रांजणगाव महागणपती तीर्थक्षेत्र अष्टविनायकांपैकी असल्यामुळे या देवस्थानात भाविकांची मोठी गर्दी होते. पुणे-नगर रस्त्यालगत हे मंदिर आहे. फुले, हार आणि प्रसाद विक्रेत्यांनी तसेच अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्यांनी महाव्दार ते मंदिर प्रवेशद्वाराजवळ दुकाने थाटली आहेत. भाविकांची गर्दी झाल्यास अनेक जण हमरस्त्यावरच वेडीवाकडी वाहने लावून दर्शनासाठी जातात. रांजणगाव येथे एमआयडीसी असल्यामुळे याच रस्त्यावरून मोठय़ा प्रमाणात कंटेनरद्वारे मालवाहतूक सुरू असते. हा रस्ता मोठय़ा वर्दळीचा असून परिसरात हॉटेल व्यवसायही मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. वेडीवाकडी वाहने लावल्यामुळे या ठिकाणी छोटय़ा मोठय़ा अपघातांच्याही घटना घडल्या होत्या. त्यामुळे पुणे ग्रामीणच्या वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षकांनी पाहणी करून याबाबत अहवाल दिला होता.
मंदिर परिसरात मोठय़ा प्रमाणात होत असलेली गर्दी आणि राज्यातील एक महत्त्वाचे देवस्थान यामुळे मंदिर परिसरात सुरक्षिततेलाही धोका आहे. या मंदिरावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचेही गुप्तचर विभागाने सांगितले आहे. त्या दृष्टीने काही सुरक्षिततेच्या उपाययोजना देखील करण्यात आल्या होत्या. काही महिन्यांपूर्वीच या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुरक्षिततेचे प्रात्याक्षिक घेण्यात आले होते. त्यावेळी सुरक्षिततेमध्ये काही त्रुटी असल्याचेही आढळून आले होते. त्या त्रुटी कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या पाश्र्वभूमीवर वाहतूक कोंडी व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मंदिर परिसराभोवती व प्रवेशद्वारासमोरील डाव्या व उजव्या बाजूला दोनशे मीटर अंतरापर्यंत वाहने लावण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर तीस दिवसांमध्ये नागरिकांनी त्यांच्या सूचना व हरकती पाठविण्याचे अवाहन पुणे ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.
पार्किं गसाठी स्वतंत्र जागा
रांजणगाव महागणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आता जवळ स्वतंत्र पार्किंग ची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. लवकरच त्या ठिकाणी वाहनतळ निर्माण केला जाईल. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न सुटेल. मंदिराच्या सर्व बाजूंना वाहने लावण्यास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा