कोजागरी पौर्णिमेनिमित्त शहरातील उद्यानांची वेळ वाढविण्यात आली असून, मध्यरात्री बारापर्यंत ती नागरिकांसाठी खुली राहणार आहेत. शनिवारी पहाटे सहा ते ११ आणि सायंकाळी साडेचार ते मध्यरात्री १२ अशी उद्यानांची वेळ असेल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम ६६ (१०) अन्वये, सार्वजनिक उद्याने, बागा, मनोरंजनासाठी मोकळ्या जागांची निर्मिती करणे महापालिकेला बंधनकारक आहे.
हेही वाचा >>> मराठा आरक्षण: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याला धनंजय मुंडेंनी येणे टाळले
महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत उद्यान विभागाकडून २११ उद्याने, मत्स्यालय आणि प्राणिसंग्रहालय विकसित करण्यात आले आहे. उद्यानांचे विकसन, सुशोभीकरण, देखभाल-दुरुस्तीविषयक कामे उद्यान विभागाकडून केली जातात. यातील बहुतांश मोठ्या उद्यानांमध्ये नागरिकांची नियमित गर्दी असते. कोजागरी पौर्णिमेनिमित्त दर वर्षी नागरिक उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. त्यामुळे यंदा उद्यानांची वेळ वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी ती पहाटे सहा ते ११ आणि सायंकाळी साडेचार ते रात्री १२ पर्यंत नागरिकांसाठी खुली राहणार आहेत, अशी माहिती उद्यान विभागप्रमुख अशोक घोरपडे यांनी दिली.