पुणे महापालिकेत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण काल(रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला काही तास उलटत नाही तोच क्रेनच्या मदतीने साहित्य खाली घेत असताना, मेघडंबरीचा समोरचा काहीसा भाग तुटून खाली पडल्याची घटना घडली. या घटनेनंतर शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे.
पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल अनावरण झाले. त्या कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार, महापौर मुरलीधर मोहोळ, शिवसेनेचे नेते व मंत्री सुभाष देसाई यांच्यासह खासदार, आमदार आणि नगरसेवकांसह अन्य पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. परंतु कार्यक्रमानंतर आज दुपारी क्रेनच्या मदतीने साहित्य खाली घेतले जात असताना, शिवरायांचा पुतळ्यावर असलेल्या मेघडंबरीच्या समोरच्या बाजूस क्रेनचा धक्का लागला आणि त्यामुळे काहीसा भाग तुटून खाली पडला. या घटनेची माहिती शहरात पसरताच घटनास्थळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांसह शिवप्रेमींनी गर्दी केली आणि त्यानंतर भाजपाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
याबाबत पुणे महापालिकेचे विद्युत विभागाचे अधिकारी श्रीनिवास कुंदूल म्हणाले की, ”छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असल्याने, पुतळ्याच्या सभोवताली सजावट करण्यात आली होती. हा कार्यक्रम झाल्यानंतर आज साहित्य काढले जात असताना क्रेनचा धक्का मेघडंबरीच्या समोरील बाजूस लागला. त्यामुळे काहीसा भाग तुटून पडला आहे. ही घटना अपघाताने घडली आहे. मात्र आमच्यावर चुकीचे काम केल्याचा आरोप होत आहे. हे आम्हाला मान्य नसून, लवकरच काम पूर्ण केले जाईल.”
महोपौरांच्या दालनात शाई फेकून निषेध –
वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या दालनात शाई फेकून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मेघडांबरीचा काही भाग पडल्याचा निषेध नोंदविला.